maharashtra-ats-investigates-suspects-linked-to-pakistan-based-shahzad-bhatti-network : महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Mumbai : पाकिस्तानस्थित कथित दहशतवादी हस्तक आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित शहजाद भट्टी याच्या नेटवर्कशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या राज्यभरातील ११२ जणांची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील १४ प्रादेशिक युनिट्सच्या ५८ विशेष पथकांनी एकाच वेळी १५० हून अधिक ठिकाणी छापेमारी करत संशयितांकडून महत्त्वाची माहिती आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली.
एटीएसच्या तपासानुसार, पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित सहकाऱ्यांकडून फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप सारख्या समाजमाध्यमांचा वापर करून भारतीय तरुणांशी संपर्क साधला जात असल्याचा संशय आहे. या माध्यमांतून तरुणांना आर्थिक आमिषे दाखवणे, धार्मिक किंवा संवेदनशील विषयांद्वारे भडकावणे तसेच देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या कथित नेटवर्कमध्ये आबिद जाट ऊर्फ आबिद छल, अजमल गुजर, हम्माद मेमन, राणा हुसेन आणि अशरफ बशीर आलम यांच्यासह इतर काही पाकिस्तानस्थित हँडलर्सचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे.
यापूर्वी मे महिन्यात एटीएसने याच प्रकरणात ५७ संशयितांची चौकशी केली होती. त्यानंतर तपासाचा विस्तार करत आणखी १०२ ते ११२ संशयितांची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असून त्यांच्याशी संबंधित सर्व बाबींची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
Vikas Thakre: विधान भवनात आमदारांच्या जेवणात आढळली माशी; अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश
या कारवाईदरम्यान नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यांतून सुमारे दहा संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतूनही १६ हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली. संशयितांकडून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून त्यांच्या बँक खात्यांसह आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.
एटीएसच्या माहितीनुसार, बेरोजगार किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा गैरवापर करण्याचे प्रयत्न या नेटवर्ककडून होत असल्याचा संशय आहे. तसेच अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची वाहतूक, हेरगिरी आणि कथित स्लिपर सेल तयार करण्यासाठीही समाजमाध्यमांचा वापर केला जात असल्याची शक्यता तपासली जात आहे.
शहजाद भट्टी हा मूळचा लाहोर येथील असून पूर्वी समाजमाध्यमांवर कंटेंट क्रिएटर म्हणून सक्रिय होता. मात्र, तपास यंत्रणांच्या माहितीनुसार तो सध्या दुबईत वास्तव्यास असून तेथून कथित गुन्हेगारी नेटवर्कचे संचालन करत असल्याचा संशय आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ तस्करी, शस्त्रास्त्रांची तस्करी, हेरगिरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आरोपांचीही चौकशी सुरू आहे.
मार्च २०२४ मध्ये जालंधर येथे युट्युबर रॉजर संधू यांच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या प्रकरणात तसेच बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी झीशान अख्तर याला भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही भट्टीवर असल्याची माहिती तपास यंत्रणांनी यापूर्वी दिली होती.
दरम्यान, एटीएसने पालकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुलांच्या समाजमाध्यमांवरील हालचालींवर लक्ष ठेवावे, त्यांच्या वर्तनात अचानक बदल आढळल्यास किंवा संशयास्पद ऑनलाइन संपर्क दिसून आल्यास तातडीने संबंधित तपास यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे की, सध्या चौकशी सुरू आहे.








