Bacchu Kadu : भाजप मित्रपक्षांनाच संपवतो; राष्ट्रवादीत ‘आतील भाजप’ सक्रिय, बच्चू कडूंचा आरोप

bachhu-kadu-serious-allegations-against-bjp-and-ncp-internal-politics : राष्ट्रवादीतील पाच-सहा नेते भाजपसाठी काम करत असल्याचा दावा; शेतकरी प्रश्नावरून रेल्वे रोखण्याचा इशारा

Amravati येथे आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच पाच ते सहा नेते असे आहेत, जे प्रत्यक्षात भाजपसाठी काम करत आहेत. थेट भाजपमध्ये प्रवेश न करता राष्ट्रवादीतच राहून पक्षाला आतून कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.

राष्ट्रवादीत राहून भाजपची बाजू घेणारे काही नेते पक्षाची ताकद कमी करत असून, राष्ट्रवादीला कमजोर करण्याची ही भाजपची रणनीती असल्याचा आरोप कडू यांनी केला. भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला देताना ते म्हणाले की, भाजप आपल्या मित्रपक्षांनाही संपवण्याचे राजकारण करतो.

Vidarbha Sahitya Sangha : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत ‘घमासान’; माजी उपाध्यक्षांनाच नाकारले सभागृह!

यापूर्वीही त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत या पक्षाची तुलना विषारी सापाशी केली होती. “भाजपसोबत न मैत्री बरी, न शत्रुत्व; आम्ही शत्रुत्व स्वीकारले आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी “ते कधीही नाग पाठवू शकतात,” असा राजकीय इशाराही दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सत्तासमीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, बारामती येथे घडलेल्या एका घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असताना कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. लोक भाजपकडे संशयाने पाहतात, असे ते म्हणाले. “भाजपने खांद्यावर हात जरी टाकला, तरी लोक म्हणतात—हा मेला,” अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी वातावरण तापवले. या विधानामुळे राजकीय चर्चेला अधिक वेग आला आहे.

Disha Committee : वन विभागाच्या तांत्रिक पेचामुळे मेळघाटातील विकासकामे ठप्प; ‘दिशा’ बैठकीत यंत्रणांनी मांडला तक्रारींचा पाढा

कडू यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली. “पंधराशे रुपये देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेकडून पैसे वसूल केले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. “एकीकडे देणे आणि दुसरीकडे काढून घेणे हीच सरकारची नीती आहे,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. “शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास महाराष्ट्रात रेल्वे चालू देणार नाही,” असा इशारा देत आगामी काळात गनिमी काव्याने आंदोलन छेडण्याचे संकेत त्यांनी दिले.

शेतकरी प्रश्नासोबतच त्यांनी आरोग्य विभागातील निर्णयांवरही प्रश्न उपस्थित केले. पूर्वी सिव्हिल सर्जनकडे असलेले औषध खरेदीचे अधिकार मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. “कमिशनसाठी औषधांचे दर वाढवले जात आहेत,” असेही ते म्हणाले. “ना खाऊंगा, ना खाने दूंगा,” असे म्हणणारेच आज टेंडर प्रक्रियेतून सर्वाधिक भ्रष्टाचार करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Zhilla parishad election : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे मोर्चेबांधणी; शिंदेसेनेच्या नव्या चेहऱ्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार?

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरूनही कडू यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “ज्यांना दोन पाय नाहीत, त्यांच्या पगारांचा वेळेवर भरणा न करणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. बच्चू कडू यांच्या सलग आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद, भाजपवरील गंभीर आरोप, शेतकरी कर्जमाफी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून पुढील काळात संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.