Bacchu Kadu : तर शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान करू नये

Farmers Should Not Vote for the Mahayuti : बच्चू कडूंचे आवाहन, मुख्यमंत्र्यांनी तारीख पाळलीच पाहिजे

Amravati मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा केली आहे. “ही तारीख आता त्यांनी पाळलीच पाहिजे. अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या सत्ताधारी पक्षांना मतदान करू नका, असे आवाहन आम्ही शेतकऱ्यांना करू,” असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी दिला.

बच्चू कडू यांनी रविवारी पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “कर्जमाफीचा पैसा थेट शेतकऱ्यांकडे न जाता बँकांकडे जातो. अतिवृष्टीमुळे आज शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. त्याला तातडीच्या रोख मदतीची गरज आहे. सध्याची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे, ही सकारात्मक बाब आहे.”

Local Body Elections : बुलढाणा जिल्हा परिषद निवडणूक रंगतदार होणार!

ते पुढे म्हणाले, “३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना चालू आर्थिक वर्षातील कर्जाची परतफेड करावी लागणार नाही. मात्र अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डळमळीत झाली आहे. त्यामुळे पुढील हंगामात कर्ज मिळावे यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर सरकारने कर्जमाफीसाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर आम्ही सत्ताधारी पक्षांविरोधात मतदान करण्याचे आवाहन करू.”

कडू म्हणाले, “आमचे आंदोलन यशस्वी झाले. पावसामुळे अनेक अडचणी आल्या, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला प्रतिसाद द्यावा लागला, हे आमच्या आंदोलनाचे यश आहे. कमी संख्येतील आंदोलनकर्त्यांनाही मोठा जनसमर्थन मिळाले. आमच्यावर आरोप करणाऱ्यांना आम्ही न्यायालयात खेचू; पाच वकिलांची टीम त्यासाठी तयार आहे.”

Winter session : हिवाळी अधिवेशनाचे काऊंटडाऊन सुरू !

ते पुढे म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर उपाय शोधण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आमची बदनामी होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी लढतोय, पण आता स्वतःच्याच मनातील निराशेने आम्ही त्रस्त झालो आहोत,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

शेवटी कडू म्हणाले, “विरोधकांनी एक तरी आंदोलन करून दाखवावे. आम्ही कर्जमाफीचा मुद्दा राज्यभर चर्चेत आणला आणि सरकारला पावले उचलण्यास भाग पाडले. ही शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे,” असे ते म्हणाले.