Harshwardhan sapkal declares congress candidature withdrawal from Baramati elections: भाजपला विरोध कायम, सुनेत्रा पवार यांनीही भाजपसोबत फारकत घेण्याचे आवाहन
Pune बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि सभ्यतेचे जतन करण्यासाठी काँग्रेसने ही निवडणूक लढवायची नाही, असे ठरवल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज स्पष्ट केले. मात्र, ही माघार म्हणजे महायुतीला दिलेला पाठिंबा नसून भाजपला आमचा कायम विरोध राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार या रिंगणात असून, त्यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली होती. ही निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार अशी भूमिका सुरुवातीला घेण्यात आली होती; मात्र सर्वच स्तरांतून वाढता दबाव पाहता अखेर पक्षाने मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या. या घडामोडींची माहिती देताना सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आम्हाला फोन आला होता आणि त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. मात्र, आम्ही त्यांच्या सांगण्यावरून माघार घेतलेली नाही.
यावेळी बोलताना सपकाळ यांनी भाजपवर कडक शब्दांत टीका केली. भाजप हा विखारी आणि विषारी पक्ष आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनीही भाजपसोबतची फारकत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीतून माघार घेतानाच त्यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा मुद्दा पुन्हा लावून धरला. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी गुन्हे दाखल करावेत ही आमची मागणी आजही कायम आहे आणि त्यापासून आम्ही मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा, भाजप आक्रमक
महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा विचार करून आणि पक्षातील सर्व नेत्यांशी संवाद साधूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. ही केवळ पोटनिवडणूक आहे, खरी लढत २०२९ मध्ये होईल आणि त्यावेळी बारामतीचा आमदार हा काँग्रेसचाच असेल, असा ठाम विश्वासही सपकाळ यांनी व्यक्त केला. बारामतीमध्ये एकूण ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असताना केवळ काँग्रेसलाच माघारीसाठी का विचारणा केली जात होती, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.








