Four Murtizapur executive suspended for six years : मूर्तिजापूरमधील चार पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी
अकोला : भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे, कटकारस्थान रचणे तसेच पक्षाच्या विचारधारेशी गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपने कठोर कारवाई केली आहे. मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर चार पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
उमेदवार हर्षद साबळे तसेच नगर परिषद निवडणुकीतील इतर उमेदवारांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे जिल्हा भाजप अध्यक्ष संतोष शिवरकर यांनी ही कारवाई केली. पक्षशिस्त, पक्षाची विचारधारा आणि अधिकृत उमेदवारांचे काम यशस्वी करणे हे प्रत्येक पदाधिकाऱ्याचे कर्तव्य असून, त्यात कसूर करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Mahayuti Government : अमरावती रेल्वे उड्डाणपूल निर्मितीसाठी १२५.३७ कोटींचा निधी
हकालपट्टी करण्यात आलेले पदाधिकारी
मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे खालील पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे—
कमलाकर गावंडे : मंडल कार्यकारिणी उपाध्यक्ष
अमोल पिंपळे : भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष
श्रीकांत रामेकर : भाजप युवा मोर्चा मंडल अध्यक्ष
नितीन भटकर : नमामी गंगे अभियान प्रमुख
या कालावधीत संबंधित व्यक्तींना कोणत्याही पक्ष बैठकीचे निमंत्रण दिले जाणार नाही, तसेच कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही.
या कारवाईची शिफारस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. निवडणूक काळात मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून पक्ष संघटनेशी गद्दारी करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, असे संतोष शिवरकर यांनी स्पष्ट केले.
ZP Elections : इच्छुकांची बॅनरबाजी, स्वतःच केली उमेदवारी जाहीर
कोणतीही अपेक्षा न ठेवता तीन पिढ्यांनी संघर्ष करून पक्ष उभा केला असून, त्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पक्षाच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आल्याचे भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.








