Bjp training campaign : ‘नेतेगिरी करण्याआधी कार्यकर्ता बना’चा ठाम संदेश !

bjp-mandatory-training-campaign-maharashtra-2026-prashikshan-varsh : 20 फेब्रुवारीपासून भाजपचे सक्तीचे प्रशिक्षण महाअभियान

Mumbai : ‘नेतेगिरी करण्याआधी कार्यकर्ता बना’ हा स्पष्ट आणि ठाम संदेश देत भारतीय जनता पक्ष यांनी देशभरात सक्तीचे प्रशिक्षण महाअभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नेतृत्वाने यंदाचे वर्ष ‘प्रशिक्षण वर्ष’ म्हणून घोषित केले असून, पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, विद्यमान नेते तसेच बाहेरून पक्षात दाखल झालेल्या सर्वांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील या अभियानाची सुरुवात 20 फेब्रुवारीपासून होणार आहे.

या महाअभियानाची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंमलबजावणीकडे त्यांचे विशेष लक्ष असणार आहे. पश्चिम विभागासाठी गुजरातचे माजी खासदार के. सी. पटेल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागात गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे.

Narhari zirwal : नरहरी झिरवळ प्रकरणात अडचणीत राष्ट्रवादी कोंडीत!

या प्रशिक्षणाचा मुख्य गाभा म्हणजे नेतृत्व करण्यापूर्वी पक्षाचा विचार समजून घेणे आणि तो आचरणात आणणे. पुढील 5 ते 25 वर्षांसाठी वैचारिकदृष्ट्या सक्षम आणि संघटनात्मकदृष्ट्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘व्यक्ती निर्माणातून संघटन निर्माण आणि संघटन निर्माणातून राष्ट्रनिर्माण’ ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून राज्यातील सर्व 1,223 मंडळांमध्ये प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

प्रशिक्षणात आधुनिक प्रचार तंत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. पीपीटी सादरीकरण, सोशल मीडियासाठी रील तयार करणे, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, तसेच जनतेपर्यंत पक्षाची भूमिका परिणामकारकरीत्या पोहोचवण्याचे कौशल्य यांचे मार्गदर्शन दिले जाईल. मंडळ ते प्रदेश स्तरावरील प्रशिक्षकांचे प्रथम प्रशिक्षण होईल आणि त्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी शिबिरे घेतली जातील. प्रशिक्षणार्थींकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.

महाराष्ट्रातील अभियानाची औपचारिक सुरुवात 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीने होईल. या बैठकीला सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, 14 प्रदेश प्रशिक्षक आणि जिल्हा प्रशिक्षक उपस्थित राहतील. 24 फेब्रुवारी रोजी केंद्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय बैठक होणार आहे. त्यानंतर वर्षभर प्रदेश, जिल्हा आणि मंडळ पातळीवर निवासी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. शक्तिकेंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

Anil Bonde : ड्रग माफियांसोबत बांगलादेशी घुसखोरांचे कनेक्शन; अनिल बोंडे म्हणाले, ‘एक ऑपरेशन आणखी करावे लागणार’

या शिबिरांमध्ये पक्षाची वैचारिक बांधिलकी, कार्यपद्धती, कार्यकर्त्यांचे वर्तन, पक्षाचा इतिहास आणि विकास, समाजाप्रती संवेदनशीलता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांचे आकलन, विविध मुद्द्यांवर पसरवले जाणारे ‘फेक नॅरेटिव्ह’ कसे खोडून काढायचे, तसेच सरकारच्या योजनांशी जनसामान्यांना कसे जोडायचे याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणाची ठिकाणे आलिशान नसावीत, भोजन साधे असावे आणि निवास व्यवस्थाही साधी ठेवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

एकूणच, शिस्तबद्ध, वैचारिकदृष्ट्या सक्षम आणि आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करणारा कार्यकर्ता घडवण्याच्या उद्देशाने भाजपने हे महाअभियान सुरू केले असून ‘आधी कार्यकर्ता मग नेते’ हा संदेश या प्रशिक्षण वर्षातून ठळकपणे अधोरेखित केला जाणार आहे.