BJP just stamping, MNS leader strongly attacks : भाजप फक्त स्टॅम्प मारतेय’, मनसे नेत्याचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
Mumbai : महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर थेट हल्लाबोल केला आहे. मुंबईत भाजप जिंकत नाही, तर त्या-त्या भागातील पारंपरिक, स्थानिक उमेदवारच निवडून येत आहेत. भाजप फक्त या उमेदवारांवर आपला ‘स्टॅम्प’ मारते, त्यामुळे त्यांच्या विजयाचे श्रेय भाजपला देता येणार नाही, अशी घणाघाती टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.
अविनाश जाधव म्हणाले की, भाजप ज्या-ज्या ठिकाणी जिंकत असल्याचा दावा करते, तिथे प्रत्यक्षात त्या परिसरातील जुने, लोकांमध्ये रुजलेले उमेदवार निवडून येतात. नवपाडा परिसराचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, नारायण पवार आणि अशोक राऊळ हे दोन्ही नगरसेवक स्थानिक पातळीवर ओळखले जाणारे आहेत. नारायण पवार यांचा मूळ पक्ष काँग्रेस आहे, तर अशोक राऊळ हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होते. ही माणसं भाजपची विचारधारा घेऊन उभी राहिलेली नाहीत, तर स्थानिक राजकारणातून मोठी झालेली आहेत. भाजप फक्त त्यांच्या नावावर आपला शिक्का मारते आणि विजय आपलाच असल्याचा दावा करते, असा आरोप त्यांनी केला.
BMC Election : मुंबईत एकनाथ शिंदेंमुळे भाजपचं नुकसान झाल्याचा आरोप
मुंबई महापालिकेच्या निकालात भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या असून ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. महापौर निवडणुकीपूर्वी कोणताही धक्का बसू नये, यासाठी सर्वच पक्ष आपापल्या नगरसेवकांना सांभाळण्यात गुंतले आहेत.
दरम्यान, भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील आठ दिवस मुंबईबाहेर जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, या काळात कोणताही राजकीय अनर्थ होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात असल्याचं बोललं जात आहे. महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप सत्तास्थापनेचा औपचारिक दावा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nitin Nabin : नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
याचदरम्यान मुंबई महापौर पदावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये पडद्यामागे चर्चा सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 2017 सालच्या महापालिकेतील राजकीय घडामोडींची ‘भरपाई’ म्हणून यावेळी भाजप आणि ठाकरे गटामध्ये समन्वय होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे नगरसेवक गैरहजर राहतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास महापौर निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
दुसरीकडे, मुंबईत महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा यासाठी शिंदे गटाची शिवसेना देखील जोरदार प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीपूर्वी मुंबईच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याची चिन्हं स्पष्ट दिसत असून, अविनाश जाधव यांच्या भाजपविरोधी हल्ल्यानंतर या चर्चांना आणखी धार आली आहे.
BMC Mayor : आरक्षणाच्या त्या नियमामुळे भाजपचे स्वप्न धोक्यात!
मुंबई महापालिकेच्या 227 सदस्यांच्या सभागृहात भाजप 89, शिवसेना ठाकरे गट 65, शिवसेना शिंदे गट 29, काँग्रेस 24, मनसे 6, एमआयएम 8, राष्ट्रवादी काँग्रेस 3, समाजवादी पार्टी 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 1 जागेवर विजयी झाला आहे. महापौर कोणाचा होणार, याकडे आता संपूर्ण मुंबईसह राज्याचं लक्ष लागलं आहे.








