mantralaya-fda-bribery-line-code-sting-narahari-zirwal-pa-allegations : एफडीए परवान्यांसाठी सांकेतिक भाषेत लाच मागणीचा खुलासा
Mumbai : मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित परवाने मंजूर करण्यासाठी सांकेतिक ‘रेषा’ पद्धतीने लाच मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालेल्या या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या दालनाशी संबंधित काही कर्मचाऱ्यांची नावे चर्चेत आली असून, मंत्र्यांचे वैयक्तिक सहाय्यक रामदास गाडे आणि एक लिपिक यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. या आरोपांमुळे राज्याच्या सत्ताकेंद्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औषध विक्री परवान्यांशी संबंधित प्रकरणांत ड्रग्ज इन्स्पेक्टरकडून त्रुटी नोंदवल्यानंतर संबंधित दुकानाचा परवाना निलंबित केला जातो. अशा निलंबनाविरोधात अपील करण्याचा अधिकार मंत्र्यांकडे असतो. मात्र तक्रारदार मेडिकल दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष सुनावणी मंत्री न घेता त्यांच्या कार्यालयातील काही कर्मचारीच अपील ऐकत असल्याचा आरोप आहे.
Boy locked Anganwadi : धक्कादायक… अंगणवाडीत चार वर्षीय बालक रात्रभर अडकला!
स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलेल्या कथित पुराव्यानुसार, पैशांची थेट मागणी न करता फाईलवरील स्टिकी नोट्सवर उभ्या रेषांच्या स्वरूपात सांकेतिक खूण केली जात होती. एक उभी रेषा म्हणजे ५० हजार रुपये, दोन उभ्या रेषा म्हणजे १ लाख रुपये तर तीन उभ्या रेषा म्हणजे दीड लाख रुपये अशी ‘कोडिंग’ पद्धत वापरली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित फाईलवर रेषा मारल्यानंतर मध्यस्थाच्या माध्यमातून दुकानदाराला बाहेर नेऊन पैशांचा व्यवहार पूर्ण केला जात असल्याचेही स्टिंगमध्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे. कथितरित्या रक्कम मिळाल्यानंतरच परवाना पुनर्स्थापित करण्याचा आदेश दिला जात होता, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
या आरोपांनंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण देताना या प्रकरणाची पूर्वकल्पना नसल्याचे म्हटले आहे. माझ्या नावाचा किंवा पदाचा गैरवापर करून कोणी बेकायदेशीर कृत्य करत असेल तर ते अजिबात सहन केले जाणार नाही. चौकशीत माझ्या कार्यालयातील कोणताही कर्मचारी दोषी आढळल्यास मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
Prakash Bharsakle : आमदार भारसाकळेंना मागितली दोन कोटींची खंडणी?; बिश्नोई गँगच्या नावाने कथित फोन
दरम्यान, स्टिंगचे व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, वसुलीसाठी नाही, असा स्पष्ट संदेश देत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. गृह विभाग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कथित ‘लाईन गेम’ची चौकशी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू असून संबंधित व्हिडीओ, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. चौकशीनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असले तरी मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या या कथित नव्या पद्धतीने राज्यभरात संताप आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.








