Buldhana Municipal Council : महायुती विरुद्ध मविआ लढतीची दाट शक्यता; राष्ट्रवादीचे दोन्ही गट अद्याप ‘गुलदस्त्यात

Mahayuti and MVA likely to face off in a straight contest : भाजपकडून मोर्चेबांधणीला वेग, शिंदेसेना ‘घाटावर’ समतोल साधण्याच्या तयारीत

Buldhana पालिका निवडणुकीत मैत्रीत कुस्ती खेळल्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी थेट आमनेसामने भिडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीतील पक्ष एकत्र लढण्याचे संकेत देत असताना, महाविकास आघाडीही एकसंधपणे रणांगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अलीकडील वक्तव्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

चिखली येथील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी “जिल्हा परिषदेत महायुतीचाच झेंडा फडकणार” असे ठाम विधान केले होते. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) वगळता समविचारी पक्षांना सोबत घेऊन ‘मिनी मंत्रालय’च्या निवडणुका लढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक आता स्पष्टपणे महायुती विरुद्ध मविआ अशी होण्याची शक्यता बळावली आहे.

Nitin Nabin : नितीन नबीन यांची केरळसाठी मोठी खेळी

जिल्ह्यातील राजकीय गणित पाहता काँग्रेस व भाजपची ताकद जवळपास समसमान मानली जाते. अशा स्थितीत शिंदेसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिंदेसेनेची ताकद घाट परिसरात अधिक असून, घाटाखाली तुलनेने कमी आहे.

त्यामुळे भाजप–शिंदेसेना युती घाटावर व घाटाखाली परस्पर समतोल साधत जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याच्या रणनीतीवर काम करत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राजकीय आखाड्यात सक्रिय हालचाली सुरू केल्याचे दिसून येते.

पालिका निवडणुकांत जिल्ह्यात अव्वल ठरलेली भाजप सध्या चांगल्याच जोशात आहे. हाच विजयाचा फॉर्म जिल्हा परिषदेतही कायम ठेवत झेडीपत सलग पाच वर्षे सत्तेत राहण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. यासाठी प्रसंगी महायुतीतील शिंदेसेनेला पूर्ण ताकदीने सोबत घेण्याची तयारीही भाजपकडून दर्शवली जात आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.

दरम्यान, शिंदेसेनेकडून जिल्हा परिषद निवडणुकीत आजी-माजी आमदारांच्या मुलांना राजकारणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. बुलढाणा, मेहकर, देऊळगाव राजा तालुक्यांमध्ये याबाबत हालचाली सुरू आहे.

BMC Power Tussle : मुंबईच्या महापौरपदावरून भाजप–शिवसेनेत तणाव; सत्तेसाठी ‘नाशिक’ पॅटर्नची चर्चा!

मोताळा, मेहकर व लोणार तालुक्यात प्रत्येकी एक, देऊळगाव राजा तालुक्यात एका गटात नेत्यांच्या पातळीवर चाचपणी सुरू असल्याचे समजते. एकूणच जिल्हा परिषद निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नव्हे, तर २०२९ च्या मोठ्या राजकारणाची रंगीत तालीम ठरण्याची शक्यता आहे. महायुती, मविआ आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अंतिम भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.