Buldhana Politics : बुलढाणा काँग्रेसमध्ये मोठी गळती; मित्रपक्ष आणि विरोधकांनीच फोडली खिंडार!

buldhana-congress-mass-defection-rahul-bondre-leadership-challenge : सत्ताधारी महायुतीसह ठाकरे गटाकडूनही कार्यकर्त्यांची पळवापळवी; राहुल बोंद्रेंचे ‘निष्ठावंत’ भाजपच्या गळाला

Buldhana जिल्ह्यात कधीकाळी भक्कम पकड असलेल्या काँग्रेस पक्षाला सध्या मोठ्या राजकीय गळतीचे ग्रहण लागले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे या जिल्ह्याशी जवळचे नाते असतानाही, स्थानिक पातळीवर निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे पक्षांतराचे सत्र थांबताना दिसत नाही. सत्ताधारी शिंदे सेना आणि भाजपमध्ये होणारी भरती तर सुरूच आहे, मात्र आता मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) कडूनही काँग्रेसला धक्के मिळायला लागल्याने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासमोर पक्ष संघटना टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे निष्ठावान समजले जाणारे पदाधिकारीच आता साथ सोडून जात असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. पिंपळगाव सराई आणि सैलानी पट्ट्यातील बोंद्रेंचे अत्यंत विश्वासू पदाधिकारी भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. हा राहुल बोंद्रे यांच्यासाठी वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा आणि मोताळा परिसरात काँग्रेसमधून गळती वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Zilla Parishad elections : झेडपीत भाजपचे ‘कमबॅक’ होणार का? जिल्हाध्यक्षांपुढे घाटावरील ‘गडा’चे आव्हान!

आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडूनही काँग्रेसला घेरले जात आहे. ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर तालुक्यातील काही महत्त्वाच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह हिवरा खुर्द परिसरातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

Disha committee meeting : ‘दिशा’ बैठकीचा अजेंडा फुगला; ३७ मंत्रालयांच्या १०१ विषयांची ‘डीआरडीए’वर टांगती तलवार!

सत्ताधारी गटासह विरोधकांकडेही काँग्रेसचे कार्यकर्ते वळत असल्याने, काँग्रेसची संघटनात्मक बांधणी कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष जिल्ह्याशी संबंधित असूनही कार्यकर्त्यांमध्ये ही अस्वस्थता का आहे? हा प्रश्न आता सामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेणे किंवा स्थानिक पातळीवर समन्वय नसणे, ही या गळतीमागील प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे.