Demand for suspension of the Principal Secretary and the District Collector : पालकमंत्र्यांची दांडी, केंद्रीय मंत्र्यांना डावलले; माजी राज्यमंत्र्यांची राज्यपालांकडे तक्रार
Buldhana २६ जानेवारी २०२६ रोजीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या नियोजनाच्या अभावावरून मोठा राजकीय वाद पेटला आहे. जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रशासनाने सर्व नियम आणि शिष्टाचार धाब्यावर बसवल्याचा आरोप करत, माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव आणि बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. या गंभीर अक्षम्य चुकीबद्दल दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी लेखी मागणी सावजी यांनी आज, २७ जानेवारी रोजी महामहीम राज्यपालांकडे केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहणाचा मान पालकमंत्र्यांचा असतो. मात्र, बुलढाण्याचे पालकमंत्री प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हाधिकारी किंवा उपस्थित लोकप्रतिनिधींची मदत घेणे अपेक्षित असते.
जिल्ह्यातच केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित असतानाही प्रशासनाने त्यांना या मुख्य सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही, ही बाब शिष्टाचाराचा भंग करणारी असल्याचे सावजी यांनी निवेदनात म्हटले आहे. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ध्वजारोहण उरकल्याने राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होत आहे.
सुबोध सावजी यांनी या प्रकरणाला ‘प्रजासत्ताक दिनाचा अपमान’ असे संबोधले आहे. त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधान सचिवांचे मार्गदर्शन का घेतले नाही? जिल्ह्यात केंद्रीय मंत्री असूनही त्यांना ध्वजारोहणासाठी पाचारण का केले गेले नाही? हा प्रशासनाचा केवळ निष्काळजीपणा नसून जाणीवपूर्वक केलेला बेजबाबदारपणा आहे. पालकमंत्र्यांनी प्रकृतीबाबत प्रशासनाला नक्की कधी माहिती दिली, याबाबतही सावजी यांनी संशय व्यक्त केला आहे.
सुबोध सावजी यांच्या मते, हा प्रकार म्हणजे संविधानाचे प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वजाच्या प्रतिष्ठेवर झालेला आघात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. बुलढाण्यातील या प्रशासकीय गोंधळामुळे महायुती सरकारलाही विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.








