व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार शुक्रवारी होण्याची शक्यता

Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार शुक्रवारी होण्याची शक्यता

union-cabinet-reshuffle-shiv-sena-eknath-shinde-shrikant-shinde-minister : शिंदे सेनेला दोन मंत्रीपदांची शक्यता, श्रीकांत शिंदेंचे नाव आघाडीवर

Mumbai : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्राप्त माहितीनुसार, 17 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळू शकते. मात्र, केंद्र सरकारकडून किंवा भाजप नेतृत्वाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडींसह केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही या बैठकीत चर्चा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑपरेशन टायगरनंतर शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

शिवसेनेकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. पक्षातील संघटनात्मक कामगिरी, संसदीय अनुभव आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अनुकूलता या बाबी लक्षात घेऊन त्यांच्या नावाला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे. संध्याकाळी शिवसेनेचे सर्व खासदार चार्टर्ड विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना होणार असून, त्यानंतर रात्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमित शाह यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे.

Ncp crisis : राष्ट्रवादीत अंतर्गत खदखद; संवादाच्या अभावामुळे असंतोष वाढल्याचा दावा

राज्यमंत्रीपदासाठी मात्र पक्षात मोठी चुरस असल्याचे चित्र आहे. ठाकरे गटातून शिंदे सेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका खासदाराची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. मराठवाड्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्याचवेळी पक्षातील ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांच्याही नावाची चर्चा सुरू असून, वरिष्ठतेचा निकष विचारात घेतला जाईल का, याकडेही लक्ष लागले आहे. उर्वरित खासदारांना संसदीय समित्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील-आष्टीकर यांचा समावेश आहे. या प्रवेशानंतर लोकसभेत शिंदे सेनेच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून एनडीएमधील सहयोगी पक्ष म्हणून शिवसेनेचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात असून, त्याचा परिणाम केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्वावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. एनडीएमध्ये सहभागी झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यमंत्रीपदाऐवजी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी कायम ठेवली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्या पक्षाला प्रतिनिधित्व मिळते का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vijay wadettiwar, Pratibha dhanorkar : वडेट्टीवारांकडे ११ तर धानोरकरांकडे १६ नगरसेवक; चंद्रपूर काँग्रेसचा गटनेता कोणाचा होणार? विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्व चर्चा या सूत्रांच्या माहितीवर आधारित असून, अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतरच मंत्रीपदांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे 17 जुलैपूर्वी दिल्लीतील राजकीय बैठका आणि घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

error: Content is protected !!