व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay wadettiwar, Pratibha dhanorkar : वडेट्टीवारांकडे ११ तर धानोरकरांकडे १६ नगरसेवक; चंद्रपूर...

Vijay wadettiwar, Pratibha dhanorkar : वडेट्टीवारांकडे ११ तर धानोरकरांकडे १६ नगरसेवक; चंद्रपूर काँग्रेसचा गटनेता कोणाचा होणार? विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी

Divisional Commissioner to decide the Congress legislature party leader in the Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता विभागीय आयुक्तांच्या दरबारात

Chandrapur चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदावरून खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत वाद आता थेट विभागीय आयुक्तांच्या दरबारात पोहोचला आहे. विभागीय आयुक्तांकडून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची नगरसेवक संख्या पडताळण्याचे काम सुरू झाले आहे. या छाननीनुसार, वडेट्टीवार यांच्याकडे ११ तर धानोरकर गटाकडे १६ नगरसेवक असल्याचे समोर आल्यामुळे आता काँग्रेसचा अधिकृत गटनेता कोणाचा होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला एक समझोता झाला होता. त्यानुसार महापौरपद खासदार धानोरकर यांच्या गटाला, तर गटनेता आणि स्थायी समितीचे सभापतीपद वडेट्टीवार यांच्या समर्थकांना देण्याचे ठरले होते. या सूत्रानुसार वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची गटनेतेपदी नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र, अंतर्गत मतभेद आणि राजकीय गणितांमुळे काँग्रेसला महापालिकेत बहुमत सिद्ध करता आले नाही आणि त्यांचा महापौरपदाचा उमेदवार पराभूत झाला.

Vijay wadettiwar: राजकीय हित साध्य, आता लाडक्या बहिणींना विसरले! तब्बल ९२ लाख महिला योजनेतून बाद; विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर बोचरा वार

सत्ता स्थापनेतील या अपयशानंतर दोन्ही नेत्यांमधील गटबाजी कमालीची उफाळून आली.
आपल्याकडे सर्वाधिक नगरसेवक असल्याचा दावा करत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गटनेता बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांना हटवून सुरेश अडबाले यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. धानोरकर यांच्या या निर्णयाविरोधात वडेट्टीवार समर्थकांनी तातडीने न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळवली. न्यायालयाच्या प्रक्रियेनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा विभागीय आयुक्तांकडे आले.

Vinayak raut : गिरीजा राऊत प्रकरणाला नवे वळण; ‘मोठे राजकीय षडयंत्र सुरू’

खासदार धानोरकर यांच्या वतीने १६ नगरसेवकांनी प्रतिज्ञापत्र सादर करून सुरेश अडबाले यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे, आज सोमवारी वडेट्टीवार समर्थकांनीही विभागीय आयुक्तांची भेट घेऊन ११ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र सुपूर्द केले.
विशेष म्हणजे, महापालिकेत सत्ता स्थापनेचा प्रयत्न होण्यापूर्वीच खासदार धानोरकर यांच्या गटाने विभागीय आयुक्तालयात स्वतंत्र नोंदणी करून आपला गट स्थापन केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही गट एकत्र आले होते. मात्र, आता हा समझोता मोडीत निघून दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. संख्याबळाचा विचार करता सध्या खासदार धानोरकर यांच्या गटाचे पारडे जड दिसत असले, तरी विभागीय आयुक्त आता यावर काय कायदेशीर निर्णय देतात आणि काँग्रेसचा अधिकृत गटनेता म्हणून कोणाला मान्यता मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!