Chandrapur Municipal Corporation : महापालिका निवडणुकीतून ‘विजय’ दूर गेला अन् काँग्रेसची ‘प्रतिभा’ संपली!

MP-pratibha-dhanorkar-indirectly-attacks-vijay wadettiwar-for-congres-failure : धानोरकर म्हणतात, “मला व्हिलन ठरवलं, सत्य जनतेसमोर मांडणार”; संताप कुणावर

Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याने काँग्रेससमोर गंभीर प्रश्न उभा केला आहे. संख्याबळ आपल्या बाजूने असतानाही अंतर्गत गटबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि नेतृत्वातील मतभेदांमुळे मनपाची सत्ता हातातून निसटली. या सत्तांतरानंतर शहरात एकच चर्चा रंगली आहे या राजकीय चित्रपटाचा हिरो कोण आणि व्हिलन कोण? मात्र दोन्ही गट स्वतःला हिरो समजत असताना प्रतिस्पर्धी गटाला व्हिलन ठरवत आहेत आणि याच वादात काँग्रेसचा ‘विजय’ दूर गेला, तर ‘प्रतिभा’ संपली, अशी टोलेबाजी सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रथमच ठाम भूमिका मांडत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. “मला या संपूर्ण प्रकरणात ‘व्हिलन’ ठरवण्यात आलं, पण योग्य वेळी मी संपूर्ण सत्य जनतेसमोर मांडणारच,” असा थेट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या विधानाकडे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील काही नेत्यांना दिलेले प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे.

Akola Municipal corporation : चार वर्षांनंतर सत्ता, पहिल्यांदा गाड्यांची चिंता!

चंद्रपूर महानगरपालिकेत ऐनवेळी भाजपचा महापौर निवडून आल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. या उलथापालथीमागे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष कारणीभूत ठरल्याची चर्चा रंगली. विशेषतः धानोरकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेदांचा फायदा भाजपने घेतला, अशी चर्चा आहे.

काँग्रेस व मित्रपक्षांच्या नवनिर्वाचित आणि पराभूत उमेदवारांसाठी आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात बोलताना धानोरकर यांनी सत्ता स्थापनेदरम्यान घडलेल्या घटनाक्रमाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, दिल्लीतील काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की महापौर आपलाच असावा किंवा आपण सक्षम विरोधी पक्षात बसावे. त्या सूचनांनुसारच भूमिका घेतल्याचा त्यांचा दावा आहे.

ZP election : झेडपीची निवडणूक केव्हा? पावसाळ्यापर्यंत बघावी लागणार वाट

धानोरकर यांच्या मते, राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट असतानाही चंद्रपूरच्या जनतेने पक्षावर विश्वास दाखवला. मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्या हितशत्रूंनी कट रचून त्यांना लक्ष्य केले. “नेते पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करतात; पण त्यांच्या अवतीभवतीचे काही स्वार्थी कार्यकर्ते गटबाजी करून कानभरणी करतात. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवडणूक व सत्ता स्थापनेदरम्यान झालेल्या कथित अपमानाचा मुद्दा मांडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनीही अप्रत्यक्षपणे सत्ता जाण्यामागे धानोरकर जबाबदार असल्याचे सूचित केल्याचे बोलले जाते.

Nitin Gadkari : अमरावतीच्या आर्थिक विकासाचा मेट्रोमार्ग कागदी रूळावर रखडला

चंद्रपूरमधील हे सत्तानाट्य आता केवळ महापौरपदापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर काँग्रेसच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणारे ठरत आहे. हिरो-व्हिलनच्या वादात पक्षाची प्रतिमा आणि जनाधार दोन्ही पणाला लागले आहेत. पुढील काळात सत्य बाहेर येईल, असा इशारा धानोरकरांनी दिला असला तरी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष किती तीव्र होतो आणि त्याचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

___