Chandrashekhar Bawankule criticises Uddhav Thackeray, calling his Ram Raksha recitation “mere hypocrisy” : चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला, व्होट बँकसाठी केविलवाणा प्रकार सुरू असल्याची टीका
Nagpur उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण हा निव्वळ ढोंगीपणा आहे. पायाखालचा जनाधार निसटल्यामुळेच आता प्रभू श्रीरामाच्या नावावर मतांची बँक तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडी, महसूल विभागाचे निर्णय आणि महायुती सरकारच्या विविध योजनांवर सविस्तर भाष्य केले. उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या राजकीय भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत बावनकुळे म्हणाले की, प्रभू श्रीराम आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसून आस्था, संस्कार आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सन्मानपूर्वक निमंत्रण असूनही उद्धव ठाकरे तिथे गेले नाहीत आणि आता जनाधार कमी झाल्यानंतर त्यांना रामाची आठवण आली आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि मतपेढी मजबूत करण्यासाठीच त्यांचा हा सारा खटाटोप सुरू आहे.
Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का, १०० कोटींची मोफत साडी बंद !
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी स्पष्ट केले की, देवेंद्र फडणवीस यांनी आयुष्यभर हिंदुत्वाचे संस्कार जपले आहेत. बाबरी आंदोलनाच्या काळात ते स्वतः कार सेवेत सक्रिय सहभागी होते. आज त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या भूतकाळात डोकावून पाहावे की कारसेवेच्या वेळी ते स्वतः कुठे होते. महायुतीतील अंतर्गत मतभेदांच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगत बावनकुळे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.
महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये सातत्याने उत्तम समन्वय आणि संवाद सुरू असून सरकार विकासाच्या अजेंड्यावर एकत्रितपणे काम करत आहे. विरोधकांकडे कोणताही सकारात्मक मुद्दा उरलेला नसल्यानेच त्यांच्याकडून अशा वावड्या उठवल्या जात आहेत, असा घणाघात त्यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य संयुक्त आंदोलनाच्या चर्चांवर बोलताना त्यांनी टोला लगावला की, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून इथे आंदोलनांनी नव्हे, तर केवळ सकारात्मक आणि विकासात्मक कामांतूनच जनाधार निर्माण होतो. दरम्यान, देशातील महिला आरक्षण विधेयकाला जनतेचा मोठा पाठिंबा असून काँग्रेसमधील अनेक खासदारही पक्षाची अधिकृत भूमिका सोडून या विधेयकाच्या बाजूने कौल देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.








