Chhagan bhujbal : गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तातडीचा निर्णय; पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध करणार

maharashtra-lpg-gas-shortage-kerosene-available-at-petrol-pumps-chhagan-bhujbal-statement : उत्पादन वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न – छगन भुजबळांची माहिती

Mumbai : राज्यात घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीचा उपाययोजना आराखडा तयार केला असून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात केरोसिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळाला नाही तर पर्याय म्हणून केरोसिनचा वापर करता यावा, यासाठी पेट्रोल पंपांवर केरोसिन विक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.

भुजबळ यांनी सांगितले की, राज्यातील गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर कंपन्यांनी राज्यातील घरगुती एलपीजी गॅसचे दैनंदिन उत्पादन ९ हजार मेट्रिक टनांवरून वाढवून ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत नेल्याची माहिती दिली आहे. तसेच एलपीजी उत्पादन आणि वितरणात निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचे कामही सुरू असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा प्रशासनाच्या उदासीनतेवर सभागृहात कडक प्रहार

 

सध्याच्या परिस्थितीत घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅस उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. घरगुती गरज भागवल्यानंतर उरलेला गॅस रुग्णालये, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि स्मशानभूमी यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी शंभर टक्के प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल. औषधनिर्मिती उद्योग आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित उपहारगृहांसाठी एलपीजी वितरणात पन्नास टक्के प्राधान्य ठेवण्यात आल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी सभागृहात दिली.

यावेळी केरोसिनच्या वापराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की राज्यात सध्या केरोसिनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन देऊ नये, असे निर्देश यापूर्वी न्यायालयाकडून देण्यात आले होते. मात्र सध्याच्या गॅस टंचाईच्या परिस्थितीचा विचार करून सर्व नागरिकांना केरोसिन उपलब्ध करून देण्याबाबत न्यायालयाला माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे केरोसिन डिलर्समार्फत तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध करून देण्याची योजना सरकारने आखली आहे.

Sudhir mungantiwar : महाराष्ट्र विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ सादर

गेल्या काही वर्षांत केरोसिनचे वितरण मोठ्या प्रमाणात बंद झाल्यामुळे केरोसिन डिलर्सची साखळी तुटली होती. त्यामुळे आता भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे केरोसिनमध्ये होणारी भेसळही टाळता येईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की एलपीजीचा विषय प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. केंद्र सरकारकडून देशात एलपीजीचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी रांगा लागणे आणि काळाबाजार होण्याच्या तक्रारी समोर आल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis : धर्मांतर विधेयक मुस्लिमविरोधी नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

राज्यातील कारवाईदरम्यान आतापर्यंत १२०८ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून सुमारे ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत मागील महिन्यात वाढ झाली असली तरी एलपीजी उत्पादन वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे छगन भुजबळ यांनी सभागृहात सांगितले. राज्य सरकार केंद्र सरकारशी सातत्याने संपर्कात असून एलपीजी आणि इतर पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

__