Ruling party and opposition unite for development works : मतभेद विसरून विकासकामांसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकवटले; राजकीय राजधानीतून सकारात्मक संदेश
Chikhli जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखली नगरपरिषदेत निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता सलोख्याचे वारे वाहू लागले आहेत. नवनिविर्वाचित नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पदभार स्वीकारताच, पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांचा सत्कार करत विकासासाठी एकत्रित काम करण्याची ग्वाही दिली. टोकाच्या राजकीय संघर्षांनंतर समोर आलेले हे चित्र चिखलीच्या सुसंस्कृत राजकारणाची प्रचिती देणारे ठरले आहे.
निवडणूक काळात चिखलीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, आता सत्तेचे समीकरण स्पष्ट झाल्यानंतर विरोधकांनी खिलाडूवृत्ती दाखवली आहे. केवळ औपचारिक सत्कार न करता, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना साथ देऊ,” असा सकारात्मक पवित्रा विरोधकांनी समाजमाध्यमांतूनही घेतला आहे.
Kishor Garole : मेहकरच्या नगराध्यक्षांचा ‘ॲक्शन मोड’; पदभार स्वीकारताच स्वच्छता अभियान
नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनीही विरोधकांच्या या भूमिकेचे स्वागत केले. “प्रत्येक प्रभागातील प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून विकासकामांना गती दिली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. यापूर्वी आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या ‘सलोखा संवादा’कडे काँग्रेसने पाठ फिरवली होती; मात्र आता प्रत्यक्ष पालिका कामकाजात हा समन्वय दिसून येत असल्याने ‘देर आये, दुरुस्त आये’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Ravindra Chavhan : विलासराव देशमुखांच्या ‘अपमाना’वरून देऊळगाव राजात रणकंदन
सध्या राज्यात आणि जिल्ह्यात विसंगत सत्तासमीकरणे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना, चिखलीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा संवाद एक आदर्श ठरत आहे. वैयक्तिक मतभेद आणि राजकीय स्पर्धा बाजूला ठेवून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी दोन्ही बाजूंचे लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने चिखलीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. हा सलोखा केवळ सुरुवातीच्या दिवसांपुरता मर्यादित राहतो की आगामी पाच वर्षे चिखलीच्या विकासाचा कणा ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








