Chikhli APMC : चिखली बाजार समितीत शिंगणे-बोंद्रे गटाची ‘पकड’ कायम; श्रीकृष्ण धोंडगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड

buldhana-chikhli-apmc-vice-chairman-election-shrikrishna-dhondge-unopposed : माजी उपसभापतींच्या राजीनाम्यानंतर सत्तेची समीकरणे स्थिर

Chikhli चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी श्रीकृष्ण तेजराव धोंडगे यांची अविरोध निवड झाल्याने स्थानिक राजकारणात सत्तासंतुलनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. माजी उपसभापती रामेश्वर शिवशंकर खेडेकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत धोंडगे यांची एकमेव उमेदवारी वैध ठरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.

खामगाव येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एस. के. गारोळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या प्रक्रियेचे कामकाज पाहिले. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ही विशेष सभा पार पडली, ज्यात धोंडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने छाननीअंती त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

Shegao Politics : शेगावात नगराध्यक्षांना मोठा धक्का; पहिल्याच बैठकीत भाजपने बजेट फेटाळले

चिखली बाजार समितीचे कामकाज माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार राहुल बोंद्रे, प्रा. नरेंद्र खेडेकर आणि ज्येष्ठ नेते एकनाथ पाटील थुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. धोंडगे यांची ही निवड या दिग्गज नेत्यांच्या गटाचे संघटनात्मक वर्चस्व अधिक बळकट झाल्याचे निदर्शक मानली जात आहे. नवनियुक्त उपसभापती धोंडगे यांचा प्रा. नरेंद्र खेडेकर आणि एकनाथ पाटील थुट्टे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व हार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समितीचे सभापती डॉ. संतोष वानखेडे आणि माजी उपसभापती रामेश्वर खेडेकर यांच्यासह संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NDCC Farmers : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार पण, घोटाळ्यात अडकलेल्या एनडीसीसी बँकेच्या कर्जदारांचे काय होणार?

ही बिनविरोध निवड जरी अंतर्गत एकजुटीचे लक्षण मानली जात असली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीतील ही राजकीय बांधणी महत्त्वाची ठरणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती हे ग्रामीण राजकारणाचे केंद्र असल्याने या निवडीचे पडसाद भविष्यातील राजकीय घडामोडींवर उमटण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.