अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबारप्रकरणी आक्रमक भूमिका
Nagpur सुप्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने बॉलीवूडसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यात टायगर थोडक्यात बचावला असला, तरी त्याचा चालक जखमी झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अभिनेत्याशी फोनवरून संवाद साधत त्याला धीर दिला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सध्या दोन दिवसांच्या नागपूर मुक्कामी आहेत. मुंबईतील या गंभीर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ टायगर श्रॉफला फोन करून त्याची विचारपूस केली. मुंबईचे पोलीस गुन्हेगारी मोडून काढण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, कोणीही चिंता करण्याची गरज नाही, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच, या हल्ल्याची जबाबदारी बिष्णोई गँगने स्वीकारली असली, तरी हल्लेखोर कुठेही दडून बसले असतील तरी त्यांना शोधून काढू, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हे हल्लेखोर भाड्याचे गुंड असून ते महाराष्ट्रातून नव्हे, तर देशातून किंवा परदेशातून सूत्रे हलवत आहेत. ते देशाच्या बाहेर जरी असले, तरी केंद्र सरकारच्या मदतीने त्यांचा बंदोबस्त केला जाईल. या संपूर्ण गँगची पाळेमुळे उखडून फेकून एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणेच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जाईल.
आर्वी बाजार समितीत सत्तासंघर्षाला उधाण; उपसभापती प्रशांत वानखेडें विरोधात अविश्वास प्रस्ताव
दरम्यान, नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या पोळ्याच्या सणादिवशी महापालिकेच्या वतीने आयोजित भव्य ‘मारबत महोत्सवाला’ खुद्द टायगरचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थिती लावली होती. एका बाजूला जॅकी श्रॉफ मुख्यमंत्र्यांसोबत नागपुरात महोत्सवाचा आनंद घेत असतानाच, दुसऱ्या बाजूला मुंबईत त्यांच्या मुलावर झालेल्या हल्ल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या हाय-प्रोफाइल गोळीबार प्रकरणातील हल्लेखोरांचा पोलीस कसा शोध घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








