Chief Minister’s Bullet Ride Lands in Controversy; Opposition Calls It a ‘Publicity Stunt’ Over Expired PUC : बुलेटची मालकी, कागदपत्रे आणि ‘स्टंटबाजी’वर प्रश्न उपस्थित
nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे पालन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज थेट बुलेट चालवत मंत्रालयात दाखल झाले. मात्र, या बुलेटस्वारीमुळे नवा वाद ओढवला असून मुख्यमंत्र्यांच्या बुलेटचे पीयूसी एक्स्पायर असल्याचे उघड झाले आहे. यामुळे नियमांचे पालन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’ केल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बचतीचा सल्ला दिला आहे. इराणने होर्मीच्या सामुद्रधुनीवरील ताबा सोडण्यास नकार दिल्यामुळे भविष्यात इंधनाचे मोठे संकट ओढावण्याची शक्यता आहे. या आवाहनानंतर सत्ताधारी गोटातून काटकसरीला सुरुवात झाली. पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यात केवळ दोन गाड्या ठेवल्या, नितीन गडकरींनी बसने प्रवास केला, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासकीय विमानांच्या वापरावर बंधने आणली. याच मालिकेचा भाग म्हणून आज मुख्यमंत्री स्वतः बुलेटवरून मंत्रालयात आले, तर त्यांचे अंगरक्षकही बुलेटवर त्यांच्या मागे-पुढे तैनात होते.
मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट परिधान करून सुरक्षेचे नियम पाळले असले तरी, त्यांच्या बुलेटच्या नंबरवरून ऑनलाईन माहिती काढली असता गाडीची पीयूसी लॅप्स झाल्याचे समोर आले. हे आयते कोलीत हाती लागताच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पोलीस दंडाची पावती फाडणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Neet paper leak : टेलिग्रामवर लाखोंमध्ये प्रश्नपत्रिका विक्री, सीबीआय तपासात देशव्यापी रॅकेट उघड !
तसेच ही बुलेट नेमकी कोणाची, ती वापरण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी का केली गेली नाही आणि ही केवळ प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी आहे का, असे टोकदार प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमावर नियमांच्या उल्लंघनामुळे टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे.








