‘Mahareshim’ will be an industrial boon : अभियानाला सुरुवात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रेशीम रथाचे उद्घाटन
Buldhana जिल्ह्यातील रेशीम उद्योगाच्या विकास व विस्तारासाठी महारेशीम अभियान वरदान ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. रेशीम कार्यालयामार्फत 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ‘महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते रेशीम रथाचे उद्घाटन करण्यात आले.
शेती उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, गहू, मका, ज्वारी या पारंपरिक पिकांबरोबर रेशीम शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, रेशीम विकास अधिकारी एन.बी. बावगे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॅा. पाटील म्हणाले की, ‘रेशीम शेतीचा जास्तीत जास्त वापर जिल्ह्यात व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावे. रेशीम हे किफायतशीर आणि फायद्याचे नगदी पीक आहे. मलबरी रेशीम शेतीपासून पहिल्यावर्षी एकरी जवळपास तीन लाखांचे उत्पन्न मिळण्यास वाव आहे. रेशीम शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळते.’
एक एकरातील रेशीम शेतीसाठी मनरेगा योजनेंतर्गत लाभ मिळतो. तर त्यापेक्षा जास्त एकरात रेशीम शेती करण्यासाठी केंद्र सरकारच्या समग्र सिल्क योजनेतून पाच लाखापेक्षा जास्त अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
MLA Shweta Mahale : सिंचन विहीर वाटपात गैरप्रकार; आमदार ॲक्शन माेडवर !
राज्यात तुती लागवडीव्दारे रेशीम उद्योग विकास करण्याकरिता महारेशीम अभियान 2025 राबविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, बुलढाणा अंतर्गत 88 गावांत कार्यक्रम घेण्यात येईल. तसेच गावातील शेतकऱ्यांना रेशीम शेती उद्योगाबाबत संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. रेशीम शेती उद्योगासाठी इच्छुक शेतकऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.