Newcomers vs loyalists Intense debate in two groups at core committee meeting : नवखे विरुद्ध निष्ठावंत मुंबईतील कोअर कमिटी बैठकीत दोन गटात तीव्र वाद
Mumbai : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत दोन गटांमध्ये तीव्र वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना उमेदवारी द्यावी की लोकसभा- विधानसभा निवडणुकीत सातत्याने काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, या मुद्द्यावरून बैठक तापली. परिणामी या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.
भाजपच्या सांगली महापालिकेसाठी संभाव्य उमेदवारांची एक प्राथमिक यादी गुरुवारी रात्री तयार करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या यादीत बदल करण्यात आल्याने पक्षात नाराजी पसरल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नसताना प्रभाग क्रमांक १४सह काही ठिकाणच्या इच्छुकांनी उमेदवारी मिळाल्याचे सांगत प्रचार सुरू केल्यामुळे गोंधळात आणखी भर पडली आहे.
स्थानिक पातळीवर उमेदवार निश्चित न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. त्याआधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतही बैठक पार पडली होती. मात्र, कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवार ठरवताना नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांचे समर्थक आणि पक्षातील मूळ, जुने कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष स्पष्टपणे समोर आला.
एका गटाने नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना पक्षात घेताना त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यामुळे त्यांना संधी देणे आवश्यक असल्याची भूमिका घेतली. तर दुसऱ्या गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी झटलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे अन्यायकारक ठरेल, अशी ठाम भूमिका मांडली. या दोन टोकाच्या भूमिकांमुळे बैठकीत वादंग निर्माण झाले.
Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकांसाठी सत्तासंघर्ष; पालिकेत कुणाची लागणार ‘लॉटरी’?
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीप्रमाणेच मुंबईच्या बैठकीतही मेरीटवर उमेदवारी देण्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला. ज्याचे मेरीट चांगले असेल, मग तो कोणीही असो, त्यालाच उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, निष्ठावंत कार्यकर्ते आणि पूर्वी दिलेल्या शब्दांचा मुद्दा उपस्थित झाल्याने संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे समजते.
सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १३ म्हणजेच गावभाग हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून येथे भाजपचेच नगरसेवक निवडून येत असून सध्या चारही माजी नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र, यावेळी गावभागासह शहरातील काही प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांचा पत्ता कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचे सांगितले जात असले तरी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
Municipal election : महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाचे भिजत घोंगडे कायम
उमेदवारीचा हा पेच आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून येत्या दोन दिवसांत सोडवला जाईल, असे संकेत मिळत आहेत. मात्र, तोपर्यंत भाजपमधील अंतर्गत संघर्ष, नाराजी आणि गोंधळ कायम राहण्याची शक्यता असून महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
——–








