व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकांसाठी सत्तासंघर्ष; पालिकेत कुणाची लागणार ‘लॉटरी’?

Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकांसाठी सत्तासंघर्ष; पालिकेत कुणाची लागणार ‘लॉटरी’?

Power struggle over the nominated corporators : घाटाखालील पाचही नगरपरिषदांत दावेदारांची गर्दी, पडद्यामागे जोरदार डावपेच

Khamgao घाटाखालील पाच नगरपरिषदांमध्ये एकीकडे उपनगराध्यक्ष व सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच, दुसरीकडे स्वीकृत नगरसेवकपदांसाठीही राजकीय हालचालींना वेग आला आहे. ८ किंवा १० नगरसेवकांमागे १ स्वीकृत नगरसेवक या ठरलेल्या सूत्रानुसार निवड अपेक्षित असली, तरी इच्छुकांची संख्या मात्र त्याहून कितीतरी जास्त असल्याने राजकीय गणिते गुंतागुंतीची बनली आहेत.

घाटाखालील पाचपैकी तीन नगरपरिषदांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली असली, तरी स्वीकृत नगरसेवक निवडीत मित्रपक्ष, विरोधक तसेच अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. निवडणूक काळात बंडखोरी रोखण्यासाठी काही इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदाची तोंडी हमी देण्यात आली होती. तसेच अत्यल्प मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांच्या राजकीय पुनर्वसनासाठीही या पदांकडे पाहिले जात असल्याने दावे-प्रतिदावे वाढले आहेत.

Municipal election : महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाचे भिजत घोंगडे कायम

‘वरिष्ठांच्या निर्णयाकडे’ साऱ्यांचे लक्ष

स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोठी रांग लागली असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी, आमदार व प्रमुख नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे. कोणाची वर्णी लागते, कोण बाजूला पडते आणि कुणाच्या पदरी निराशा येते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

खामगाव पालिकेत भाजपचा मार्ग तुलनेने सुकर

खामगाव नगरपरिषदेत तीन स्वीकृत नगरसेवक निवडले जाण्याची शक्यता आहे. भाजपकडे २८ नगरसेवकांचे ठोस संख्याबळ असल्याने इतर पक्षांच्या पाठबळाची गरज भासणार नाही. त्यामुळे येथे भाजपची भूमिका सुलभ मानली जात असून, कोणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नांदुरात भाजप विरुद्ध आकोट विकास आघाडी

नांदुरा पालिकेत यापूर्वी ८ नगरसेवकांमागे १ स्वीकृत हे सूत्र होते. यंदाही ते कायम राहिल्यास भाजपला दोन, तर आकोट विकास आघाडीला एक स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BMC election : तुर्तास चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच, जागावाटपाचा तिढ्याकडे लक्ष

शेगावात ‘एमआयएम’ची भूमिका ठरणार निर्णायक

शेगाव नगरपरिषदेत भाजप–शिंदेसेना आघाडीचे १७ नगरसेवक आहेत. त्यामुळे दोन स्वीकृत नगरसेवक जवळपास निश्चित मानले जात असले, तरी तिसऱ्या जागेसाठी एमआयएमचे समर्थन अत्यावश्यक ठरणार आहे. या गणितात वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचे नगरसेवक कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मलकापुरात राष्ट्रवादी (अजित पवार) ‘किंगमेकर’?

मलकापूर पालिकेत काँग्रेसकडे १४ नगरसेवक असल्याने त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक जवळपास निश्चित मानला जात आहे. दुसऱ्या व तिसऱ्या जागेसाठी मित्रपक्षांची मदत आवश्यक असून, येथे राष्ट्रवादी (अजित पवार) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

PMC election : अर्ध्या रात्री बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली

जळगाव जामोद : बहुमत नसल्याने वाढली डोकेदुखी

जळगाव जामोद नगरपरिषदेत २१ जागांमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत नाही. भाजपचे सर्वाधिक ९ नगरसेवक असले, तरी स्वीकृत नगरसेवक निवडण्यासाठी मित्रपक्ष किंवा अपक्षांची साथ अपरिहार्य ठरणार आहे. दुसरी जागा कोणाच्या पदरी पडते, यावर सत्तासमीकरणे अवलंबून असतील.

किती संभाव्य स्वीकृत नगरसेवक?

नगरपरिषद एकूण नगरसेवक संभाव्य स्वीकृत
खामगाव ३५ ३
शेगाव ३० ३
जळगाव जामोद २१ २
मलकापूर ३० ३
नांदुरा २५ ३
जिल्ह्यातील राजकीय चित्र (११ पालिका)

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांतील २८६ नगरसेवकांपैकी भाजपचे ८९, काँग्रेस ६०, शिंदेसेना ४६, राष्ट्रवादी (अजित पवार) २६, राष्ट्रवादी (शरद पवार) १३, उद्धवसेना १०, एमआयएम १०, वंचित बहुजन आघाडी २, समाजवादी पार्टी १, आघाडी १७ व अपक्ष १२ नगरसेवक आहेत.

error: Content is protected !!