From Legislature to Judiciary: An invaluable gift of the Indian Constitution : संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे भव्य रॅली
Nagpur : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये फक्त आपल्या संविधानाचीच नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक ठरलेली शाश्वत मूल्ये आहेत, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित रेॅलीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. कांबळे म्हणाले की, ही मूल्ये आपल्याला तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीतून मिळाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ती भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला दिली. विविध भाषा, धर्म, जात, पंथांनी नटलेल्या भारताला एका सूत्रात बांधणारा संविधानाचा धागा डॉ. बाबासाहेबांनी अत्यंत दूरदृष्टीने विणला. विदेशात उच्च शिक्षण आणि संधी असूनही ‘आय एम इंडियन फर्स्ट, इंडियन लास्ट’ हे तत्त्व त्यांनी जपत मातृभूमीला प्राधान्य दिल्याचेही त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
Local Body Elections : सायलेंट मतदार ठरणार निर्णायक, उमेदवारांपुढे आव्हान
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक विजय वाकुलकर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी आणि जात पडताळणी समितीचे उपायुक्त मंगेश वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांची जपणूक करणे ही जबाबदारी असल्याचे सांगताना डॉ. कांबळे यांनी न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यकारी अशा प्रभावी लोकशाही स्तंभांची देणगी भारतीय संविधानाने देशाला दिल्याचे सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही संविधानाने दिलेली महान देणगी असून तिचा उपभोग घेताना इतरांच्या अधिकारांचा भंग होणार नाही याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे मत विनायक महामुनी यांनी व्यक्त केले.
Local Body Elections : भाजप व वंचितमध्ये थेट लढत; काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले. ‘घर घर संविधान’ अंतर्गत २० हजार नागरिकांपर्यंत उद्देशिका पोहोचवल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी ज्येष्ठ नागरिक हूकुमचंद मिश्रीकोटकर, काशिनाथ धांडे, गौरव आळणे, नयना झाडे व पुंडलिक बोर्डे यांना संविधान उद्देशिकेची प्रतीकात्मक भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अवनी वेखंडे-सूतवणे यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयातून निघालेल्या रॅलीचा समारोप संविधान चौक येथे करण्यात आला.








