All parties unite to surround Tanaji Sawant : तानाजी सावंतांना घेरण्यासाठी सर्व पक्ष एकत्र
Dharashiv : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी विरोधकांसह त्यांच्या मित्रपक्षांनीही एकजूट दाखवली आहे. भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांनी सावंतांविरोधात एकत्र येण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती मिळाली आहे.
या राजकीय हालचालींनंतर आमदार तानाजी सावंत यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला असून, त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की भाजप, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं, यातच आमचा विजय आहे. आम्हाला याचा काहीच फरक पडत नाही. मोठ्या पक्षांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही तरी आम्ही गाफील बसणार नाही, असंही सावंत यांनी सांगितलं.
या घडामोडींनंतर तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र टीका करत आगपाखड केली. सावंत म्हणाले, ही राष्ट्रवादी काँग्रेसची अशी औलाद आहे की सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, हे मी आधीच सांगितलं होतं आणि गेल्या महिन्याभरात त्याचा प्रत्यय सर्वांना आला आहे. हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं का? युतीची तत्त्वं मान्य आहेत का? मांडीला मांडी लावून बसतात, पण आमच्यावर त्यांना लादतात, हे योग्य नाही, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्या अजित पवार गटात प्रवेशाबद्दलही नाराजी व्यक्त केली. गरज नसताना त्यांना का घेतलं, असा प्रश्न उपस्थित करत सावंतांनी राष्ट्रवादीवर संताप व्यक्त केला.
Ananta Shinde Vijayraj Shinde : जिल्हाध्यक्षांवर केले गंभीर आरोप ; नंतर मागितली माफी!
भूम-परंडा नगरपरिषद निवडणुकीत सर्वपक्षीय एकजुटीचा सामना करत असतानाही तानाजी सावंत आत्मविश्वासाने म्हणाले की, विरोधक कितीही एकत्र आले तरी आमचा विजय निश्चित आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत आणि राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय संघर्षाने स्थानिक राजकारणाला चांगली चर्चा निर्माण केली आहे.








