Prithviraj Chavan blunt criticism of CM Davos policy : मुख्यमंत्र्यांच्या दावोस धोरणावर पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका
Mumbai: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर थेट टीका करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या दौऱ्यात झालेल्या करारांवर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दावोसमध्ये अदानी आणि लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करणे म्हणजे एक क्रूर विनोद असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असतील, तर ती आनंदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र मोठमोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, कारण सत्य शेवटी बाहेर येतेच. दावोस दौऱ्यातील घोषणांचा प्रत्यक्ष फायदा राज्याला किती झाला, हा खरा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Rahul Gandhi : जिथे भाजपला पराभव दिसतो, तिथे मतदारच गायब केले जातात
मागील दावोस दौऱ्यात जाहीर करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी महाराष्ट्रात प्रत्यक्ष किती उद्योग सुरू झाले, किती गुंतवणूक झाली आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले, याची वस्तुनिष्ठ माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मोठे आकडे मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आपल्याच राज्यातील किंवा देशातील कंपन्यांबरोबर दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर करार करण्यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. कर्नाटक सरकारचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे उदाहरण देत ते म्हणाले की, कर्नाटक सरकार दावोससारख्या मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी सामंजस्य करार करत नाही, तर केवळ परकीय गुंतवणूकदारांशीच करार करते. त्यामुळेच कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर परकीय उद्योग येतात आणि त्या राज्याचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत अदानी आणि लोढा यांसारख्या स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणे हा केवळ दिखावा असून तो एक क्रूर विनोद असल्याचे त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना इव्हेंट्स आणि घोषणांची गरज नसून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रत्यक्ष रोजगाराची आवश्यकता आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत दावोसमध्ये जाहीर करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले, यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यातील करार, गुंतवणूक दावे आणि रोजगारनिर्मिती यावर पुन्हा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
__








