In reality the Panchnamas are not being conducted alleges Sanjay Raut : प्रत्यक्षात पंचनामे सुरूच नाहीत, संजय राऊत यांचा आरोप
Mumbai: मुसळधार पावसामुळे लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले असून, ३६ लाखांहून अधिक शेतकरी आणि त्यांची कुटुंबं हवालदिल अवस्थेत आहेत. घरे पाण्यात वाहून गेली, शेती-जमिनी नष्ट झाल्या, अनेकांना अजूनही निवारा नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून मदत मिळाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात पंचनामे सुरूच नाहीत आणि मदत पोहोचलेली नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. गावोगावी जाऊन त्यांनी शेतकरी, महिला, लहान मुलं, वृद्ध तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. “शेतकऱ्यांनी स्वतः सांगितले की, मागील कर्जमाफीमुळे ते निभावून गेले. मात्र आता पुन्हा कर्जमाफी झाली नाही तर त्यांचं जगणं अशक्य आहे,” असे राऊत म्हणाले.
ZP Teachers’ Transfers : न्यायालय श्रेष्ठ की महामुनी व आमदार सुधाकर अडबाले ?
राऊतांनी सरकारवर थेट हल्लाबोल करताना म्हटले की, “फडणवीसांच्या म्हणण्यावर जाऊ नका, गोट्या खेळतोय का असे म्हणणाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. फोटोसेशन करून मदत वाटली जातेय असा दावा करणारे खोटं बोलत आहेत. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे की, पंचनाम्यासाठी अधिकारीही पोहोचलेले नाहीत.”
राऊतांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पीएम केअर फंडाचा वापर करण्याची मागणी केली. “पीएम केअर फंडातून देशभरातून प्रचंड निधी जमा झाला आहे. त्यात मुंबईतूनच सव्वा दोन लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे या फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं,” अशी मागणी त्यांनी केली.
Request for help : महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्राकडे मदतीची मागणी
याशिवाय, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन ‘उप-उपां’नी पंतप्रधानांना भेटून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सांगावी,” असा सल्ला देत राऊतांनी महायुती सरकारवर टोकाची टीका केली.
मराठवाड्यातील भीषण पूरस्थिती आणि शेतकऱ्यांच्या हवालदिल अवस्थेमुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची मागणी आता आणखी जोर धरत आहे.
_____








