Assurance to set up IT and Textile Parks in Amravati : ‘रोड शो’मधून संवाद, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचा दावा
Amravati अमरावती शहराची विकसनशीलतेच्या दिशेने वाटचाल सुरू असून येत्या काळात येथे आयटी क्षेत्र आणले जाईल. तसेच टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीत रोड शोसाठी आले होते. रोड शोच्या समारोपानंतर साईनगर येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमरावती शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती दिली.
Devendra Fadnavis : सत्तर वर्षांत शहरी विकासाकडे दुर्लक्ष, फडणविसांची टीका
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमृत-२ पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारने अमरावतीसाठी ९९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्ते विकास कामांसाठी २१२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच दक्षिण आशिया खंडातील सर्वांत मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र अमरावती विमानतळावर साकारले जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरकुले मिळाली आहेत. राज्य सरकारच्या वतीने अंबादेवी प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय वडाळी तलावाचा विकास सुरू असून अंबा नाल्याच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अमरावती शहराचा सर्वांगीण व आधुनिक विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत अमरावतीकरांनी भाजप उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
Amravati Municipal Corporation : राणा-खोडके यांच्यात ‘ओपन वॉर’, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले
दरम्यान, पंचवटी चौकातून रोड शोला प्रारंभ झाला. यावेळी अमरावती निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजप नेत्या नवनीत राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, भाजप शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, मेळघाटचे आमदार केवलराम काले, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, चंदू यावलकर, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, ॲड. प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते.








