CM’s roadshow allegedly violates model code of conduct : सार्वजनिक मालमत्तेचा वापर, विविध पक्षांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Amravati मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती येथील रोडशोदरम्यान शासकीय इमारती व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी पक्षीय बॅनर्स लावून निवडणूक प्रचार केल्याचा गंभीर आरोप करत विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी थेट भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार निवडणूक आचारसंहितेचा तसेच घटनात्मक नैतिकतेचा भंग असून, सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रार निवेदनात करण्यात आला आहे.
४ जानेवारी रोजी अमरावती येथे आयोजित मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रोडशोदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचा पक्षीय प्रचारासाठी वापर झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. मुख्यमंत्री पदाच्या अधिकारातून रोडशो आयोजित करून शासकीय साधनसामग्रीचा अप्रत्यक्ष वापर करण्यात आल्याने हा ‘इन्कम्बन्सी अब्यूज’चा प्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत समता नष्ट होत असून इतर उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
Sanjay Raut : मुंबईचे दुश्मन मुघल वृत्तीचे, संजय राऊतांची टीका
या प्रकरणात अमरावती महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी व आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचा उल्लेख करत, प्रशासन आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.
तक्रारदारांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी, जय विदर्भ पार्टी, समाजवादी पक्ष, अल्पसंख्यांक विकास आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हे निवेदन सादर केले आहे.
या तक्रारीमुळे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून, यावर निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








