Devendra Fadnavis : दावोसमध्ये करार, विदर्भात भूमिपूजन! तीन मोठे प्रकल्प आले

Groundbreaking Ceremony of Industrial Projects Signed in Davos Performed by the Chief Minister : मुख्यमंत्र्यांचे कृतीतून उत्तर; विरोधकांनी केली होती टीका

Nagpur दावोस येथे होणाऱ्या औद्योगिक करारांवरून विरोधकांनी सातत्याने टीकेची झोड उठवली होती. जर भारतीय कंपन्यांसोबतच करार करायचे होते, तर ते मुंबईत का झाले नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यासोबतच दरवर्षी होणारे कोट्यवधींचे करार केवळ कागदावरच राहतात आणि प्रत्यक्षात उतरत नाहीत, असा आरोपही विरोधकांकडून केला जात होता. मात्र, आज शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन करून विरोधकांच्या या टीकेला कृतीतून उत्तर दिले. विशेष म्हणजे, या तीनही प्रकल्पांचे सामंजस्य करार दावोस येथे पार पडले होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ‘न्यू एरा क्लिनटेक’च्या इंटिग्रेटेड कोल गॅसिफिकेशन अँड कार्बन कॅप्चर प्रकल्प आणि ‘ग्रेटा एनर्जी’च्या गॅसिफिकेशन आधारित ‘इंटिग्रेटेड ग्रीन स्टील’ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. कोल गॅसिफिकेशनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे प्रकल्प उभारले जात आहेत.

Uday samant : आम्ही जन्मापासूनच झुकत नाही, ‘पुष्पा स्टाईल’ची गरज नाही

यातील एका प्रकल्पात ‘ग्रीन स्टील’ची निर्मिती होईल, तर दुसऱ्या प्रकल्पात कोळशाच्या गॅसिफिकेशनमधून गॅस तयार केला जाईल. देशात नियोजित असलेल्या सात कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात साकारत असल्याने, दावोस करारांची ही प्रत्यक्ष अंमलबजावणी असल्याचे अधोरेखित होत आहे.

दुसरीकडे, नागपूरच्या ॲडिशनल बुटीबोरी परिसरात ‘वारी’ कंपनीच्या सोलर मॉड्यूल प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्यात आले. सोलर पॅनेलसाठी आवश्यक असणारे ‘इंगॉट’ आणि ‘वेफर’ हे अत्यंत महत्त्वाचे घटक सध्या मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केले जातात.

rohini khadse : वि’चित्रा’ताई, २५ दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?

या पार्श्वभूमीवर, वारी कंपनीने नागपुरात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याचा घेतलेला निर्णय नागपूरसह देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. १० गिगावॅट क्षमतेचा हा प्लांट भारतातील एकाच ठिकाणी सोलर इंगॉट आणि वेफर तयार करणारा सर्वात मोठा प्रकल्प असेल. यापूर्वीच बुटीबोरी एमआयडीसी परिसरात तीन कंपन्यांनी सोलर पॅनेल निर्मिती सुरू केली असून, आगामी काळात नागपूर हे देशातील सोलर मॉड्यूल आणि पॅनेल उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कथित गॅस टंचाईवरही भाष्य केले. वितरण व्यवस्थेतील कोणत्याही त्रुटीमुळे गॅसची टंचाई निर्माण झालेली नसून, काँग्रेसकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar : आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याच हवा; सेवा केली नाही तर वेतन कपात करा

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने आणि तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, एखाद्या बँकेबद्दल अफवा पसरवल्यास लोक जसे पैसे काढायला गर्दी करतात, तशीच स्थिती काँग्रेसने एलपीजी संदर्भात जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. त्यामुळे काँग्रेसने लोकांची दिशाभूल करणे थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.