व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Devendra Fadnavis : महायुती अभेद्य, पण मित्र पक्षांवर टीका होऊ नये!

Devendra Fadnavis : महायुती अभेद्य, पण मित्र पक्षांवर टीका होऊ नये!

No Bogus Voting Will Be Allowed; Every Movement Is Being Closely Monitored : फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले, बोगस मतदान होणार नाही; प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले आहे

Amravati ‘राज्यातील महायुती अभेद्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीसंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. युती होणे हे आमचे प्राधान्य आहे; परंतु काही ठिकाणी युती झाली नाही, तरी मित्र पक्षांवर कोणीही टीका करू नये,’ या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बजावले.

राज्यात येत्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये काही जणांकडून बोगस मतदानाद्वारे सत्ता हस्तगत करण्याचे प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, “या निवडणुकांमध्ये बोगस मतदान होणार नाही, कारण आम्ही प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहोत, असेही ते अमरावतीत म्हणाले.

Local Body Elections : काँग्रेस सज्ज, भाजपचा खेळ अजूनही गुलदस्त्यात!

मुख्यमंत्री म्हणाले, “बोगस मतदानासंदर्भात एक तक्रार प्राप्त झाली असून ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे.”

ते येथील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, “भाजप सर्वच निवडणुका शिस्तबद्धपणे आणि नियोजनपूर्वक लढणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागांतील बैठकांचे कामकाज पूर्ण झाले असून, अमरावती विभागाचाही आढावा घेण्यात आला आहे. पुढील आठवड्यात मुंबई विभागाचा आढावा घेतला जाणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “कार्यकर्त्यांची मानसिकता सकारात्मक असून भाजप पूर्णपणे सज्ज आहे. कोणालाही खोटे मत नोंदवून निवडणूक लढवता येणार नाही. कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना आणि दिशानिर्देश देण्यात आले आहेत.”

Rajendra Shingne : शिंगणे म्हणतात, ‘काँग्रेसविषयी शंका, पण महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही’

“संघ ही सांस्कृतिक शक्ती, प्रसिद्धीसाठी केलेले विधान”

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “हे सर्व प्रसिद्धीसाठी केलेले विधान आहे. वडिलांच्या प्रतिष्ठेवर राजकारण करणारे नेते आहेत. यापूर्वी अनेकांनी संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला, अगदी इंदिरा गांधींनी देखील बंदी घातली होती; परंतु त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. संघ ही एक सांस्कृतिक आणि देशभक्त शक्ती आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित मानवनिर्मितीचे कार्य संघ करत असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही,” असे फडणवीस म्हणाले.

error: Content is protected !!