व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Devendra fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, खरात, धर्मांतर, ड्रग प्रकरणांचा आढावा

Devendra fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, खरात, धर्मांतर, ड्रग प्रकरणांचा आढावा

devendra-fadnavis-review-law-order-nashik-conversion-ashok-kharat-drug-case : पोलिसांना कठोर तपास व भक्कम पुरावे उभारण्याचे निर्देश

Mumbai : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाची तातडीची उच्चस्तरीय आढावा बैठक घेत विविध संवेदनशील प्रकरणांचा सखोल आढावा घेतला. नाशिकमधील आयटी कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरण, अशोक खरात प्रकरण तसेच गोरेगाव आणि परतवाडा येथील घटनांबाबत त्यांनी पोलिसांकडून तपशीलवार माहिती घेत कठोर निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विशेष तपास पथकाचे प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. राज्यातील संवेदनशील प्रकरणांमध्ये तपासाची गती वाढवून दोषींना कठोर शिक्षा होईल, यासाठी तपास अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.

Vanchit Bahujan Aghadi : गायकवाड-शिंदे प्रकरणात ‘वंचित’ची उडी; चौकशीची मागणी

अशोक खरात प्रकरणात गृहमंत्र्यांनी पीडित महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. पीडितांना पूर्ण विश्वास देत त्यांचे संरक्षण सुनिश्चित करा आणि न्यायालयीन प्रक्रियेत प्रकरण मजबूत राहील अशा पद्धतीने ठोस व भक्कम पुरावे गोळा करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. या प्रकरणात कुणीही दोषी आढळल्यास त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाची त्यांनी गंभीर दखल घेतली. अशा प्रकारांना अजिबात थारा देऊ नका, असे स्पष्ट सांगत त्यांनी तपास अधिक व्यापक करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणातील सर्व संभाव्य पॅटर्न, नेटवर्क आणि संबंधित प्रत्येक कोन तपासून पाहा, कोणताही दुवा सुटू नये, असे त्यांनी पोलिसांना बजावले. नाशिक पोलिसांनी हे प्रकरण समोर आणल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुकही केले, मात्र पुढील तपास अधिक ठोस आणि परिणामकारक असावा, यावर त्यांनी भर दिला.

Mahayuti Government : राज्यातील १७ लाख कर्मचारी पुन्हा संपावर; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प?

मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी तरुणाईचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्या अशा गुन्ह्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे निर्देश दिले. ड्रग्जविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत अशा नेटवर्कचा संपूर्णपणे बंदोबस्त करा, असे आदेश त्यांनी दिले.

Water Shortage : प्रकल्पांनी गाठला तळ, बुलढाण्यात १६ हजार नागरिक टँकरवर अवलंबून

परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात पीडितांना समुपदेशनाद्वारे आधार देण्यावर त्यांनी भर दिला. तक्रार देण्यासाठी पीडितांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे असून यासाठी समाजसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या सर्व प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत ठेवण्यासाठी पोलिसांनी समन्वयाने काम करावे आणि प्रत्येक प्रकरणात परिणामकारक तपास करून दोषींना न्यायालयापर्यंत पोहोचवावे, असे स्पष्ट निर्देश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

___

error: Content is protected !!