16 thousand citizens depending on tankers in Buldhana : एप्रिलमध्येच प्रकल्पात फक्त ३३ टक्के जलसाठा; ९ गावांना टँकर, २९ विहिरी अधिग्रहित
Buldhana एप्रिल महिन्याच्या मध्यांतच जिल्ह्रयातील अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ११४ टक्के पाऊस होऊनही पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. विशेषतः मेहकर आणि बुलढाणा तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, सध्या तब्बल १६ हजार ३६९ नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.जिल्ह्यातील ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे तर २९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी सुमारे ३० टक्के पाणी विविध कारणांनी कमी होत असल्याने, येत्या मे महिन्यात टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात एकूण ७४४ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज टंचाई कृती आराखड्यात व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या बुलढाणा तालुक्यातील सैलानी, वरवंड, पिंपरखेड व चौथा या गावांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर मेहकर तालुक्यातील वडाळी, वरवंड, लोणी गवळी, हिवरा साबळे व निंबा या पाच गावांना पाच टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. याशिवाय, २९ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Bhondubaba : ‘दत्तधाम सरकार’च्या नावाखाली भोंदूगिरीचा मोठा पर्दाफाश
जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम आणि ४१ लघु प्रकल्पांमध्ये मिळून सध्या केवळ ३३ टक्के जलसाठा (सुमारे १५४ दलघमी) शिल्लक आहे. ही परिस्थिती चिंताजनक मानली जात असून, आगामी काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, पावसाचे प्रमाण समाधानकारक असतानाही जलसंधारण, वितरण आणि नियोजनातील त्रुटींमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका होत आहे. यामुळे स्थानिक प्रशासनासह राज्य शासनाच्या धोरणांवरही प्रश्न उपस्थित होत असून, या विषयावर राजकीय स्तरावरही आरोप-प्रत्यारोप तीव्र होण्याची शक्यता येत्या काळात व्यक्त होत आहे.






