Digital Fraud : ‘हॅलो, मी नाशिक पोलिस स्टेशनमधून बोलतोय’… एका फोनवर दोन कोटी उकळले

Retired cashier of Central Bank cheated of two crore rupees : मनी लॉन्ड्रिंग व टेररिस्ट फंडिंग प्रकरणात अटक करण्याची धमकी

Nandura “हॅलो, मी नाशिक पोलिस स्टेशनमधून बोलतोय. तुमच्या नाशिक येथील कॅनरा बँकेच्या खात्यातून ५७० कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग आणि टेररिस्ट फंडिंग झाली आहे. या प्रकरणात तुम्हाला अटक केली जाईल,” अशी धमकी देत सेंट्रल बँकेचे सेवानिवृत्त रोखपाल अरविंद श्रीकृष्ण कुलकर्णी (रा. मोहता प्लॉट, नांदुरा) यांची तब्बल २ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचा प्रकार ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान घडला आहे. या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील मोहता प्लॉट येथे राहणारे, सेंट्रल बँकेचे सेवानिवृत्त रोखपाल अरविंद श्रीकृष्ण कुलकर्णी (वय ७०) यांना २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव संदीप रॉय सांगून तो नाशिक पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले.

Winter session : तुकाराम मुंढेंवरून विधानसभा तापली, कृष्णा खोपडेंची धमकीची तक्रार

त्याने कुलकर्णी यांना, “तुम्ही नाशिक येथील रेणुका नगरातील एअरटेल स्टोअरमधून २५ सप्टेंबर रोजी ८४३३९८६२३५ हा मोबाईल नंबर घेतला आहे आणि त्या नंबरचा वापर करून कॅनरा बँक, नाशिक येथे खाते उघडून तेथून ५७० कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग व टेररिस्ट फंडिंग झाली आहे,” असे सांगितले.

तसेच, “तुम्ही दहशतवाद्यांशी संबंधित आहात,” असे सांगून काही लोकांचे फोटो पाठवून “हे तुमच्या ओळखीचे आहेत का?” अशी विचारणा केली. पुढे त्याने, “तुमच्या खात्याबाबत २० लोकांनी आमच्याकडे तक्रार केली आहे,” असेही सांगितले. कुलकर्णी यांनी “या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही,” असे सांगितल्यावर, फोनवरील व्यक्तीने “तुमचे फोटो मोस्ट वॉन्टेड म्हणून ९ राज्यांमध्ये पाठवले आहेत,” असे सांगितले.
३० ऑक्टोबर रोजी पुन्हा व्हिडिओ कॉल करून कुलकर्णी यांना घरातील दारे-खिडक्या बंद करण्यास सांगून त्यांना व त्यांच्या पत्नीला फोनसमोर बसवले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती यांच्या नावाने व स्वाक्षरी असलेले अटक वॉरंट पाठवून, “ही बाब कोणालाही सांगायची नाही,” अशी धमकी दिली.
कुलकर्णी यांनी पुन्हा “माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही,” असे सांगितल्यावर त्यांना एक जबाब लिहून द्यायला सांगितले. नंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातील रक्कम आरटीजीएसद्वारे पाठवण्यास सांगितले.
यानुसार कुलकर्णी यांनी ३०, ३१ ऑक्टोबर, १ व ३ नोव्हेंबर रोजी स्वतःकडील रक्कम आणि ४ नोव्हेंबर रोजी मित्रांकडून उसनवारी घेतलेले ३३ लाख असे एकूण २ कोटी १ लाख ९० हजार रुपये पाठवले.

Sudhir mungantiwar : लोकहिताचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या मुनगंटीवारांच्या बुलंद आवाजाने पुन्हा गाजणार हिवाळी अधिवेशन!

यानंतर, “वरिष्ठ अधिकारी चौकशी करून तुम्हाला निर्दोष ठरवतील आणि सर्व पैसे परत मिळतील,” असे सांगण्यात आले. मात्र ठरलेल्या दिवशी कोणीही आला नाही. संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला असता संबंधित नंबर बंद येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.