Diagnostic van will help to prevent cancer from spreading: पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते डायग्नोस्टिक व्हॅनचे लोकार्पण
Wardha प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना योग्य वेळेत चांगला व मोफत उपचार मिळावा. यासाठी शासन प्रयत्न करीत करीत आहे. या डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाचे निदान करून रुग्णांवर वेळेत उपचार करण्यास आरोग्य विभागास मोठी मदत होईल. जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन, डे केअर केमोथेरपी सेंटर व डिजिटल हॅन्ड एक्सरे मशीनच्या लोकार्पण सोहळ्यात केले.
कार्यक्रमाला आरोग्य सेवा, नागपूरचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, सहसंचालक डॉ. गवई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे, डॉ. वंजारी आदींची उपस्थिती होती.
खासगी रुग्णालयाप्रमाणे शासकीय रुग्णालयातसुध्दा रुग्णांना आधुनिक उपचाराच्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करणार आहे. यासाठी आरोग्य विभागांनी रुग्णालय बळकटीकरणासाठी शासन प्रस्ताव सादर करावे. रुग्णांना प्रसन्न वाटेल, अशी सुविधा आरोग्य विभागाने निर्माण करून द्यावी. केंद्र शासनाच्या आयुष्यमान योजनेंतर्गत ५ लाख रुपयापर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत नागरिकांनी आपले आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आवाहन यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी केले.
आताच्या काळात असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढले असून, कर्करोग, उच्चदाब, मधुमेह यांसारख्या रोगाच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासनाकडून नागपूर विभागाला वर्धाकरिता कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन उपलब्ध झाली आहे. या व्हॅनमुळे कर्करोगाचे निदान करण्यात मोठी मदत होईल, असे डॉ. शशिकांत शंभरकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.