Guardian Minister was overwhelmed by the felicitations : हा माझा सत्कार नसून जिल्ह्यातील नागरिकांचा आहे
Wardha वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर डॉ. पंकज भोयर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराने आपण भारावलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा माझा सन्मान नसून संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान आहे, अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.
हिंगणघाट येथील निखाडे भवनमध्ये नागरी सत्कार समितीच्यावतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. भारतीय जनता पार्टी तथा नागरी सत्कार समितीच्यावतीने माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार राजेश बकाणे, आमदार सुमित वानखेडे यांचाही नागरी सत्कार करण्यात आला.
Sanjay Rathod Ashok Uike Guardian Minister : यवतमाळ जिल्ह्याने दिले दोन पालकमंत्री
नागरी सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष आमदार समीर कुणावार होते. त्यांच्याच पुढाकाराने सत्कार सोहळा आयोजित केला होता. सत्काराला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर भावनिक झाले. त्यांनी अनेकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ‘मंत्रिपदामुळे आधीपेक्षा माझी जबाबदारी वाढली आहे. माजी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार सुमित वानखेडे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या साथीने जिल्ह्याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्याच्या मानस आहे,’ असं ते म्हणाले.
व्यासपीठावर हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हिंगणघाट येथील सामाजिक संस्थांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाला सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेश बकाने आणि आमदार सुमित वानखेडे यांचीही भाषणे झाली. स्वागताध्यक्ष आमदार समीर कुणावार यांनी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला प्रथमच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्याने हा संपूर्ण जिल्ह्याचा बहुमान असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील चारही विधानसभा प्रथमच काबीज केल्याने सर्व भाजप कार्यकर्त्यांना याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.