Education office : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात अनागोंदीचा कळस

gadchiroli-education-office-night-irregularities-teachers-protest-devendra-fadnavis : शिक्षणाधिकारी कार्यालयात ‘रात्रीचा दरबार’, शिक्षक संघटना आक्रमक

Gadchiroli : मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षेत्रातच शिक्षण विभागात गंभीर अनियमितता उघड झाल्याचा आरोप करत शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात दिवसभर कामकाज ठप्प ठेवून रात्री उशिरापर्यंत ‘दरबार’ भरत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष तथा माजी आमदार नागो गाणार यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.

गडचिरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षणाधिकारी – माध्यमिक यांच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर थेट सवाल उपस्थित केले.

Mehkar Municipal Council : शासकीय जमिनीचा वापर बदलला; मेहकर नगरपरिषदेला १.७३ कोटींचा दंड

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार्यालयात नियमित कार्यालयीन वेळेत अधिकारी अनुपस्थित असतात, तर सायंकाळी ६ नंतर रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि संवेदनशील जिल्ह्यात शिक्षकांना रात्री उशिरापर्यंत थांबवणे धोकादायक ठरत असून, अनेक शिक्षकांना जीव धोक्यात घालून जिल्हा मुख्यालयात यावे लागते. मात्र दिवसभर काम न झाल्याने त्यांना निराश परतावे लागते, अशी गंभीर परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकारामुळे कार्यालयात नियमबाह्य व्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, रात्रीच्या वेळेत नेमके कोणते कामकाज चालते, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. याआधीही शिक्षक परिषदेने या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानुसार शिक्षण संचालक, पुणे यांनी २५ जुलै २०२५ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग यांनी अद्याप कोणताही अहवाल सादर केलेला नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sharad pawar : राज्यसभा निवडीनंतर शरद पवारांची ‘डिनर डिप्लोमसी’

मुख्यमंत्री स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अशा प्रकारची अनागोंदी सुरू असल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याचे नागो गाणार यांनी म्हटले आहे. या कार्यालयातील दुर्व्यवहार आणि भ्रष्टाचार आता सहन केला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, अधिवेशनात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. प्रशासनाने वेळेत योग्य पावले न उचलल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात आला असून, या प्रकरणामुळे शिक्षण विभागातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
__