व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath shinde : संजय शिरसाटांच्या विधानानंतर एकनाथ शिंदे संतप्त, दिली कडक समज

Eknath shinde : संजय शिरसाटांच्या विधानानंतर एकनाथ शिंदे संतप्त, दिली कडक समज

 

eknath-shinde-angry-on-sanjay-shirsat-over-mahayuti-statement-maharashtra-politics-news : महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण

Mumbai : राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांबाबत केलेल्या विधानामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट फोन करून शिरसाट यांना कडक शब्दांत समज दिल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी आणि धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याच्या चर्चांना वेग आला होता. खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावलून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली जात असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. त्यातच सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती.

Prasad Lad : ‘मी दूत म्हणून काम करेन’, प्रसाद लाडांचा जरांगेंना शब्द, उपोषणापूर्वी चर्चेला वेग

या पार्श्वभूमीवर बोलताना संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. “काही लोक आमच्याशी बोलत आहेत. कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यांच्या पक्षात काय घडतंय हे काही दिवसांत स्पष्ट होईल,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “संजय शिरसाट आमच्या पक्षावर कसे बोलू शकतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडेही त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. “यापूर्वीही समज दिल्यानंतर शिरसाट पुन्हा राष्ट्रवादीबाबत वक्तव्य करत आहेत. यापुढे असे प्रकार सुरू राहिल्यास आम्ही थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करू,” असा इशाराही त्यांनी दिला होता.

Petrol Price hike : ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपवर ‘मेलोडी चॉकलेट’चे वाटप

या सर्व घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः संजय शिरसाट यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. “महायुतीत फूट पडेल असे कोणतेही वक्तव्य करू नका. तिन्ही मित्रपक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचे आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची विधाने टाळावीत,” अशा शब्दांत शिंदे यांनी शिरसाट यांना स्पष्ट सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील बदलते राजकीय समीकरण लक्षात घेता मित्रपक्षांमधील समन्वय टिकवणे हे महायुती नेतृत्वासमोर मोठे आव्हान मानले जात आहे.

___

error: Content is protected !!