Electricity tariff cut : घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा, कोणतीही दरवाढ नाही!

maharashtra-electricity-tariff-cut-no-price-hike-till-2030-mahavitaran-order : 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने वीजदर कपात करण्याचा आयोगाचा आदेश जारी

Mumbai : राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या कालावधीतील बहुवार्षिक वीजदर याचिकेवर अंतिम आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठी 2030 पर्यंत वीजदर टप्प्याटप्प्याने कमी होणार असून कोणत्याही प्रवर्गात दरवाढ होणार नाही, अशी स्पष्टता आयोगाने दिली आहे.

महावितरणने पाच वर्षांच्या कालावधीत वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडला होता, तो आयोगाने मान्य केला आहे. यापूर्वी मार्च 2025 मध्ये दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर पुनर्विचार याचिकेच्या आधारे जून 2025 मध्ये दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा आधार घेत तो आदेश रद्द केला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही योग्य प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करून नव्याने आदेश देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनसुनावणी घेऊन आणि सर्व बाबींची पूर्तता करून आता आयोगाने अंतिम आदेश जारी केला आहे.

Modi meeting with cm : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

या नव्या आदेशानुसार 1 एप्रिल 2026 पासून दुसऱ्या वर्षाची अंमलबजावणी सुरू होत असून ग्राहकांना आधीपेक्षा अधिक सवलत मिळणार आहे. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते दुपारी 5 या कालावधीत वीज वापरासाठी प्रति युनिट 80 पैशांऐवजी 85 पैसे सवलत मिळणार आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वेळेनुसार (टीओडी) सवलतीची योजना कायम ठेवण्यात आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 15 टक्के तर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत 25 टक्के सवलत मिळणार आहे.

घरगुती वीज ग्राहकांसाठी दरातही घट होणार आहे. महिन्याला 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांचा दर 7 रुपये 31 पैशांवरून कमी होऊन 7 रुपये 10 पैसे होणार आहे. पाच वर्षांत या प्रवर्गासाठी सुमारे 26 टक्के दरकपात होणार आहे. 100 ते 300 युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठी दर 13 रुपये 17 पैशांवरून 12 रुपये 94 पैसे इतका होणार आहे. उच्चदाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर 10 रुपये 78 पैशांवरून 10 रुपये 71 पैसे इतका कमी होणार आहे.

तसेच विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी उच्चदाब व लघुदाब चार्जिंग स्टेशनसाठी 2026-27 या वर्षासाठी 9 रुपये 50 पैसे प्रति युनिट दर निश्चित करण्यात आला असून तो 2028-29 पर्यंत स्थिर राहणार आहे. हाऊसिंग सोसायट्यांना त्यांच्या परिसरात चार्जिंग सुविधा सुरू करण्यासही प्रोत्साहन देण्यात आले आहे.

Rupali chakankar : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

दरम्यान, घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांसाठीच्या सवलती कायम ठेवण्यात आल्या असून नव्या दररचनेत त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे राज्यातील लाखो वीज ग्राहकांना दिलासा मिळणार असून आगामी काळात वीजदरात सातत्याने घट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.