Speculation over the resignations of Navneet Rana and Pravin Pote : दोन तास नवनीत राणा व प्रवीण पोटे यांच्या राजीनाम्याची चर्चा
Amravati महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच अमरावतीच्या राजकारणात ‘राजीनामा’ हा शब्द इतका गाजू लागला की, कुणी दिलाच नसताना आणि कुणाचा स्वीकारही नसताना शहरभर चर्चा सुरू झाल्या. एकीकडे भाजपच्या पराभूत उमेदवारांनी पराभवाचे खापर भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर फोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर दुसरीकडे अवघ्या दोन दिवसांत माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची ‘ब्रेकिंग’ बातमी समाजमाध्यमांवर धडकली.
विशेष म्हणजे, चार दिवसांत दोन राजीनाम्यांची चर्चा रंगली, एक मागितल्याची आणि दुसरा दिल्याची! मात्र दोन्हीही ‘राजीनामे’ प्रत्यक्षात दिलेच नाही, आणि कुणी मागितला नसल्याचे थोड्याच वेळात स्पष्ट झाले. तरीही तोपर्यंत शहरातील राजकीय वातावरण तापले होते. चर्चांना आणि अंदाजांना अक्षरशः उधाण आले होते. या गदारोळात समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या राजीनाम्याच्या बातमीमुळे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांना मात्र ‘राजीनामा दिला की नाही’ हे सांगण्यात चांगलीच दमछाक झाली.
माध्यम प्रतिनिधींपासून कार्यकर्त्यांपर्यंत शेकडो फोन येऊ लागले आणि प्रत्येकालाच तेच स्पष्टीकरण द्यावे लागले. अखेर पोटे पाटील यांनीच या व्हायरल बातमीचा फुगा फोडला. “माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द भाजपमध्येच घडली आहे. भाजपमध्येच मी मोठा झालो असून, पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या वृत्ताला खोटे, अपप्रचार करणारे आणि दिशाभूल करणारे ठरवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, भाजप २५ नगरसेवकांसह महापालिकेतील सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २० नगरसेवक कमी झाल्याने अंतर्गत कुरघोडीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. त्यातूनच ‘राजीनामा’ या शब्दाला अचानक एवढे महत्त्व आले, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
एकंदरीत, अमरावतीत काही काळ ‘राजीनामा कोणाचा?’ यावर चर्चा रंगली असली, तरी शेवटी निष्कर्ष एकच निघाला, मागितलेला राजीनामा खरा नाही आणि दिल्याची बातमीही खरी नाही. मात्र या साऱ्या प्रकाराने शहरात दोन तास तरी राजकीय मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळाली, हे मात्र नक्की!








