Farmers kidney sold : कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा आरोप

Shocking act of moneylender in Chandrapur, reality of farmers in Vidarbha exposed : चंद्रपूरातील सावकाराचे धक्कादायक कृत्य, विदर्भातील शेतकरी वास्तव पुन्हा उघड

Chandrapur: एकीकडे देशात आणि राज्यात विकसित भारत, उज्ज्वल भविष्य आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दावे केले जात असतानाच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. कर्ज फेडण्यासाठी एका खाजगी सावकाराने तरुण शेतकऱ्याला अक्षरशः स्वतःची किडनी विकायला भाग पाडल्याचा आरोप झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात राहणाऱ्या रोशन कुडे या तरुण शेतकऱ्याने हा गंभीर आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशन कुडे याने दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खाजगी सावकाराकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. मात्र दुर्दैवाने त्याच्या जनावरांचा मृत्यू झाल्याने हा व्यवसाय कोलमडला आणि कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य झाले नाही. त्यानंतर सावकाराकडून सातत्याने पैशांचा तगादा लावण्यात येऊ लागला.

ZP Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यातच

काळ जसजसा पुढे गेला तसतशी मुद्दल आणि व्याजाची रक्कम वाढत गेली. पैशांचा ताण, धमक्या आणि मानसिक छळ यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला. अखेर संबंधित सावकाराने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याचा सल्ला दिल्याचा आरोप रोशन कुडे याने केला आहे. सावकाराच्या सांगण्यावरूनच आपण आधी कोलकाता येथे आणि त्यानंतर कंबोडियाला गेलो, जिथे आठ लाख रुपयांना स्वतःची किडनी विकावी लागल्याचे रोशनने सांगितले आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील दिल्लीत, शौर्य पाटील प्रकरणावर आक्रमक

सावकारामुळेच माझ्यावर ही अमानुष वेळ आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सावकारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती किती विदारक आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्वातंत्र्यानंतरही विदर्भातील शेतकरी आजही सावकारांच्या विळख्यात अडकलेले असून सरकारी यंत्रणा आणि योजनांचा त्यांना किती मर्यादित फायदा होत आहे, यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवण्याचे दावे केले जात असताना, कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्याला स्वतःचा अवयव विकण्याची वेळ येते, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणावर राज्य सरकार, प्रशासन आणि कृषी विभाग नेमकी काय भूमिका घेणार, दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

__