Ravi Rana Writes to CM Devendra Fadnavis: Provide Aid to Farmers Before Diwali : पाण्यात उतरून केली शेतांतील नुकसानाची पाहणी
Amravati : सप्टेंबर महिन्यात पावसाने राज्यभर थैमान घातले. यामध्ये राज्यातील जवळपास ३० जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्याचाही समावेश आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाची दखल घेऊन त्यांना दिवाळापूर्वीच नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
आमदार राणा यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भातकुली, दर्यापूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, तिवसा या तालुक्यांतील शेतकरी संकटात सापडले आहेत. या पृष्ठभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत आमदार राणा यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनी थेट शेतांच्या बांधांवर जाऊन नुकसानाची पाहणी केली.
Emergency help : अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना तात्काळ मदत मिळणार !
नुकसानाची पाहणी करताना आमदार राणा स्वतः पाण्यात उतरले. अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या दिरंगाईवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी दराडे, तहसीलदार अजित येडे, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी प्रतिनिधी सराफ, तालुका कृषी अधिकारी भोसले व इतर अधिकारी होते. यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे ग्रामीण पदाधिकारी मंगेश पाटील, आशिष कावरे, विनोद जायसवाल व शेतकरी उपस्थित होते.








