Congress Tractor March : ‘सरकार झोपेत आहे; आम्ही शेतकऱ्यांचा आवाज थांबू देणार नाही’

 

Farmers’ Tractor Rally Demanding Loan and Electricity Bill Waivers : काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा; कर्जमाफी, वीजबिल माफीसाठी शेतकरी रस्त्यावर

अमरावती : राज्यातील महायुती-भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे परतवाडा येथे भव्य ‘किसान ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात शेकडो शेतकरी आणि तब्बल १०० हून अधिक ट्रॅक्टरसह कृषी उत्पन्न बाजार समितीपासून एसडीओ कार्यालयापर्यंत मोठ्या उत्साहात रॅली काढण्यात आली.

या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखडे यांनी शासनास ‘निवेदन’ देऊन शेतकऱ्यांच्या ठळक मागण्या मांडल्या. त्यात प्रति हेक्टर ५० हजार रुपये सरसकट पीक नुकसानभरपाई, वीजबिल माफी, तातडीची आर्थिक मदत, तसेच रब्बी हंगामासाठी बी-बियाणे आणि खते मोफत देण्याची मागणी करण्यात आली. खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Sharad Pawar : समाजात निर्माण झालेल्या दुहीचे पाप शरद पवारांचेच !

मोर्चादरम्यान उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतीताई मंगरोळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव तनपुरे, शहराध्यक्ष श्रीकांत झोडपे, तसेच अमोल चिमोटे, राहुल गाठे, सचिदानंद बेलसरे, दिनेश वानखडे, अमोल बोरेकार, रवी पाटील, सुधीर राहटे, कैलास आवारे, सागर व्यास, स्वप्निल देशमुख यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Local body election : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

“राज्याच्या महायुती-भाजप सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. पिके करपली, कर्जाचा डोंगर वाढला, आणि सरकार झोपेत आहे. सरसकट कर्जमाफी, प्रति हेक्टर ५० हजार भरपाई आणि रब्बी हंगामासाठी बी-बियाणे-खते मोफत मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.

“हा ट्रॅक्टर मोर्चा फक्त आंदोलन नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याची हाक आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकारने मौन बाळगू नये. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या प्रत्येक हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढेल आणि न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असे खासदार बळवंत वानखडे म्हणाले.