Food and drugs department : तीन हजार मेडिकल स्टोअर वाऱ्यावर, शासन-प्रशासन गप्प!

Not a Single Drug Inspector Available for Medical Store Inspections : तपासणीसाठी एकही औषध निरीक्षक नाही; एका कॉलवर मिळते नशेचे औषधी

Buldhana देशभरात कफ सिरपमुळे बालकांचे मृत्यू घडत असताना पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील औषध सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर दुर्लक्ष समोर आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकही औषध निरीक्षक उपलब्ध नसल्याने जवळपास ३ हजार मेडिकल स्टोअर्स ‘वाऱ्यावर’ चालत आहेत.

औषधी विक्रीवरील नियंत्रण शून्य झाल्याने ग्रामीण भागात एका कॉलवर नशेसाठी वापरली जाणारी कोडीन फॉस्फेट युक्त कफ सिरप, लैंगिक शक्तिवर्धक औषधी व हाय-रिस्क शेड्युल एच-वन औषधे सहज मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या औषधींवर वैद्यकीय चिठ्ठीशिवाय विक्री पूर्णतः बंदी असतानाही त्यांची घरपोच डिलिव्हरी सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Local Body Elections : निवडणूक लढायचीये? पहिले अर्ज करा; काँग्रेसचे आवाहन

जिल्ह्यातील २,९३१ किरकोळ व ३१४ होलसेल औषध विक्रेते कार्यरत आहेत. मात्र, फेब्रुवारी २०२४ पासून औषध निरीक्षकांची तीनही पदे रिक्त आहेत. सध्या आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) प्रा. गजानन घिरके हेच प्रभार सांभाळत आहेत.
ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्टनुसार प्रत्येक औषध निरीक्षकाने वर्षातून किमान एकदा तपासणी करणे आवश्यक असते. पण निरीक्षक नसल्याने तपासणी होतच नाही. परिणामी अनेक मेडिकल स्टोअर्सवर घातक औषधांची बेकायदेशीर विक्री वाढली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात तरुणवर्ग कोडीन फॉस्फेट युक्त कफ सिरप पिऊन नशा करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. कमी पैशात आणि गुपचूप मिळणारी नशा म्हणून या सिरपचा वापर वाढत आहे.
डोणगाव परिसरात तर रिकाम्या कोडीन बाटल्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या दिसतात, ज्यातून परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.

औषध निरीक्षकांची पदे महिनोन्‌महिने रिक्त ठेवून शासन आणि प्रशासन तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळत आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
“जिल्ह्यात निरीक्षक नसताना तपासणी कोण करणार? आणि बेकायदेशीर विक्री थांबवणार कोण?” असा सवाल स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

Local Body Elections : अकोला महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी

“डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही प्रकारचे कफ सिरप विक्री करू नये,” अशा सूचना सर्व विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, कोणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेऊ नयेत, असे आवाहन प्रा. गजानन घिरके, आयुक्त अन्न व औषध विभाग, बुलढाणा यांनी केले आहे.