Villages-still-shown-underwater-on-Google-Earth-technical hurdle-in-ward-delimitation : पुनर्वसित गावांमुळे अमरावती-भातकुली प्रशासनात संभ्रम; ग्रामपंचायत निवडणुकीवर परिणामाची शक्यता
Amravati सरकारी नोंदींनुसार गावे पुनर्वसित झाली, लोकांचे स्थलांतरही झाले; मात्र डिजिटल नकाशांवर त्यांची अद्ययावत नोंद न झाल्याने प्रशासनासमोर मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. बेंबळा प्रकल्पामुळे विस्थापित झालेली काही गावे प्रत्यक्षात नव्या ठिकाणी वसली असतानाही ‘गुगल अर्थ’ व ‘गुगल मॅप’वर ती अद्याप पाण्याखाली दाखवली जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभागरचना कशी करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या तांत्रिक अडचणीमुळे अमरावती, भातकुली आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील पुनर्वसित गावांच्या प्रभागरचनेवर अनिश्चितता निर्माण झाली असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेलाही विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भातकुली तालुक्यातील अळणगाव, हातुर्णा, कुंड खुर्द आणि गोपाळव्हाण ही गावे आता अमरावती तालुक्यात पुनर्वसित झाली आहेत. मात्र या गावांची प्रभागरचना कोण करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही जबाबदारी भातकुली तहसीलदार कार्यालयाने घ्यावी की अमरावती तहसीलदारांनी, यावरून प्रशासकीय स्तरावर संभ्रमाचे वातावरण आहे.
Farmers loan waiver : अटी-शर्तींनंतरच पात्र शेतकऱ्यांचा आकडा स्पष्ट होणार
दुसरीकडे, चांदूर रेल्वे तालुक्यातील टिटवा, येरड आणि सांवगा बुद्रुक या गावांची स्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रभागरचनेसाठी ‘गुगल अर्थ’वरील नकाशांचा आधार घ्यावा लागतो. मात्र टिटवा गाव प्रत्यक्षात घुईखेड परिसरात वसलेले असतानाही गुगल मॅपवर ते अद्याप बुडीत क्षेत्रात, म्हणजे पाण्याखाली असल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे प्रभागांची अचूक सीमा निश्चित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य निवडणूक आयोग व ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले असून त्याबाबतच्या सूचनांची प्रतीक्षा आहे. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना निश्चित वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे. सध्या ही प्रक्रिया सुरू असली तरी तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे कामात विलंब होत आहे.
उपजिल्हाधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक) ज्ञानेश घ्यार यांनी या संदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे. मात्र अद्याप स्पष्ट सूचना प्राप्त न झाल्याने प्रक्रिया ठप्प झाल्याचे चित्र आहे.
पुनर्वसित गावे एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात गेल्यामुळे प्रभागरचना व इतर प्रशासकीय प्रक्रिया नेमकी कोणत्या कार्यालयाने करावी, याबाबत स्पष्टता नाही. या ‘सीमा वादामुळे’ प्रभागरचनेची प्रक्रिया रखडल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. महसूल विभागाकडून महसुली गावे म्हणून नोंद झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पंचायत विभागाकडून होणे अपेक्षित असल्याचेही सांगितले जात आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार ठरवतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष!
टिटवा गाव प्रत्यक्षात नव्या ठिकाणी वसले असतानाही गुगल मॅपवर ते पाण्याखाली असल्याचे दिसते. डिजिटल मॅपिंगमधील ही त्रुटी अद्याप दूर करण्यात आलेली नाही. परिणामी, प्रभागरचना करताना अचूक भौगोलिक सीमांकन करणे प्रशासनासाठी कठीण ठरत आहे.
भातकुली तालुक्यातील अळणगाव, हातुर्णा, कुंड खुर्द आणि गोपाळव्हाण ही गावे पुनर्वसित होऊन अमरावती तालुक्यात आली आहेत. मात्र प्रभागरचना करताना २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या विचारात घ्यावी लागते. भौगोलिकदृष्ट्या गावे एका तालुक्यात आणि प्रशासकीयदृष्ट्या दुसऱ्या तालुक्याशी संबंधित असल्याने प्रभागरचना करताना तहसील प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.








