Congress State President criticized Dattatray Bharane : शेतकरी संकटात गायब, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Amravati राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टरवरील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत असून कृषिमंत्री बेपत्ता आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावतीत आयोजित पत्रपरिषदेत केला.
सपकाळ म्हणाले, “माजी कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणायचे, तर सध्याचे कृषिमंत्री बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी ‘आपण त्यांना पाहिलेत का?’ अशी जाहिरात काढावी लागेल. सरकार शेतकरीविरोधी असून त्यांना शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे हे महायुतीचे सरकार आहे.”
local body elections : काँग्रेसने नेमले प्रभागनिहाय निरीक्षक, अनेकांचा प्रवेश
ते पुढे म्हणाले, अमरावती येथे अदानी ग्रुपला १०० एकर जमीन मातीमोल दरात देण्यात आली आहे, तर गडचिरोलीत अवैध उत्खनन सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी मात्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, पावसामुळे झालेली नुकसानभरपाई केव्हा मिळणार याबाबत सरकार मौन बाळगत आहे.
सपकाळ यांनी सरकारकडे मागणी केली की, शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रुपयांची मदत, कर्जमाफी, तसेच खरडून गेलेल्या शेतजमिनीसाठी पाच लाख रुपयांची भरपाई द्यावी.
पत्रपरिषदेला खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, भैय्या पवार, हरिभाऊ मोहोड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Local Body Elections : काँग्रेसच्या सात मोहऱ्यांच्या हाती पक्षाचं भवितव्य!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर काँग्रेस नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. यानंतरच निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती अंतिम केली जाईल, असे ते म्हणाले.








