many-party-workers-from-congress-joining-bjp : कार्यकर्त्यांचे ‘पक्षांतर’ सुरूच, चिखलीत भाजपचा पुन्हा धक्का
Buldhana बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून काँग्रेसमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे इतर पक्षांकडे होणारे पक्षांतर थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ही घडामोड काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच घडत असल्याने पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सुरुवातीला शिंदे गटाच्या शिवसेनेने बुलढाणा आणि मोताळा येथे काँग्रेसमध्ये भगदाड पाडत अनेक कार्यकर्त्यांना आपल्या गोटात घेतले. त्यानंतर गेल्या महिन्यात भाजपने चिखली मतदारसंघात काँग्रेसला धक्का देत काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेतले. विशेष म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायपूर सर्कलमधील काही प्रमुख कार्यकर्त्यांनीही भाजपची वाट धरल्याची चर्चा होती.
Buldhana Politics : हे चाललयं काय? भाजप-काँग्रेसची भलतील ‘केमिस्ट्री’
आता पुन्हा एकदा चिखलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे निष्ठावान समजले जाणारे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी थेट मुंबईत जाऊन भाजपमध्ये दाखल झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडल्याने या घडामोडीला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
या सततच्या गळतीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसाठी ही परिस्थिती डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. चिखली मतदारसंघात एकेकाळी माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे वर्चस्व मानले जात होते. मात्र सध्याच्या घडामोडी पाहता काँग्रेसची पकड येथे हळूहळू कमकुवत होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस नेतृत्व या गळतीवर कसा अंकुश आणते, याकडे जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.








