Harshwardhan Sapkal : भाजप जिल्हाध्यक्षांवर गुन्हे दाखल; सत्तेत असूनही बुलढाणा पोलिसांनी ‘देखावा’ शिंगावर घेतला!

bjp-district-president-vijayraj-shinde-booked-for-protest-against-harshvardhan-sapkal : हर्षवर्धन सपकाळांविरोधातील ‘पुतळा दहन’ पडले महागात; जमावबंदी झुगारल्याने विजयराज शिंदेंवर कारवाई

Buldhana जिल्ह्याच्या राजकीय पटलावर काँग्रेस आणि भाजपमधील संघर्षाने आता कायदेशीर वळण घेतले असून, भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील जयस्तंभ चौक येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत पुतळा जाळला होता. मात्र, प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत हे आंदोलन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. राज्यात सत्तेत असतानाही भाजपच्याच जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जिल्ह्यात सध्या महाशिवरात्री आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली असून, मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असतानाही भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकात घोषणाबाजी करत हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन केला. शांतता भंग होऊ नये म्हणून प्रशासनाने दिलेल्या आदेशांना हरताळ फासल्याने पोलिसांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेतली. भाजपच्या या ‘शक्तीप्रदर्शना’मुळे शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता, ज्याचे रूपांतर अखेर फौजदारी कारवाईत झाले आहे.

Buldhana Collector : बेकायदेशीर हद्दवाढीविरोधात पाच गावांतील ग्रामस्थांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

या प्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, जिल्हा सचिव चंद्रकांत बर्दे, महामंत्री दत्ता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सचिन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून, तपास यंत्रणा आता अधिक वेगाने हालचाली करत आहेत. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने या कारवाईचा निषेध केला असला तरी, प्रशासनाने ‘कायदा सर्वांसाठी समान’ असल्याची भूमिका घेतल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांच्या घामाचा द्या दाम,२० हजार बोनसवर मुनगंटीवार ठाम !

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ शाब्दिक राहिलेला नसून, तो थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. या कारवाईनंतर काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय दरी अधिकच रुंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्तेचा पाठिंबा असतानाही जिल्हाध्यक्षांना अशा प्रकारे गुन्ह्याला सामोरे जावे लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे, तर दुसरीकडे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेल्या या कठोर भूमिकेचे कौतुकही होत आहे. आगामी काळात या कायदेशीर पेचामुळे बुलढाण्यातील राजकारण आणखी किती तापते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.