Healthcare Facilities : नागपूरसह मेळघाटातील आरोग्य सेवा सुधारणार !

Revenue Minister Chandrashekhar Bawankule Issues Directives in Presence of Health Minister Prakash Ambitkar : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या उपस्थितीत निर्देश

Mumbai : नागपूर, अमरावतीसह मेळघाटातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आरोग्य विभागातील प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे निर्देश महसूल मंत्री व नागपूर, अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (११ सप्टेंबर) मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांतील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रलंबित विषयांवर मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यात पदनिर्मिती, सेवांचे कार्यादेश, पायाभूत सुविधांचा विकास आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित बाबींचा समावेश होता.

Dowry victim : हुंड्याची कीड, कायदे असूनही समाज पोखरतोय !

नागपूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी अनेक प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूरसाठी १५४ पदांची निर्मिती, स्वच्छता सेवा कार्यादेश, ग्रामीण रुग्णालय पाटणसावंगी येथे आहार, सुरक्षा, वस्त्र धुलाई आणि स्वच्छता सेवांसाठी प्रशासकीय मान्यता, तसेच ट्रॉमा केयर यूनिट उमरेड आणि उपजिल्हा रुग्णालय कामठी येथील १०० खाटांच्या रुग्णालय बांधकामासाठी पाच एकर जागेची उपलब्धता यांचा समावेश आहे.

याशिवाय, १०८ नियमित पदांचा सेवार्थ प्रणालीत समावेश, उपकेंद्र बोरखेडी फाटक आणि देवळी गुजर येथे प्रत्येकी तीन पदांच्या निर्मितीचे प्रस्ताव, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान, मोहपा आणि मोवाड यांचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन यासंबंधीचे प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे सादर करण्यात आले आहेत. याशिवाय, मौदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा नगर परिषदेला हस्तांतरित करणे, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय आरोग्य योजनेत समावेश आणि गट क व गट ड यांच्या निवडसूचीची वैधता वाढवणे यासंबंधीही चर्चा झाली.

अमरावती जिल्ह्यातील प्रलंबित प्रस्ताव मार्गी..
अमरावती जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी १ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयात दुरुस्ती, मेळघाटातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन, पेसा अंतर्गत आरोग्य सेवक (महिला) यांच्या शैक्षणिक अर्हतेत शिथिलता आणि ४५ टक्के उत्तीर्ण गुणांची अट शिथील करून मेळघाटातील रिक्त पदे भरण्याची परवानगी यावर भर देण्यात आला. तसेच, वैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी वाहन चालकांच्या मानधनात वाढ, रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी २०२४-२५ आणि २०२५-२६ साठी निधी उपलब्धता आणि अमरावती येथील विभागीय संदर्भ रुग्णालयात रेडियोथेरेपी व डे केयर किमोथेरेपी सुविधा स्थापन करण्याचे प्रस्ताव मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.

Akola riot case : सुप्रीम कोर्टाचा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा आदेश

जनतेच्या आरोग्यासाठी सरकारची बांधिलकी..
नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांतील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळतील, असे आश्वासन यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.