RSS chief Mohan Bhagwat clarified his position : सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केली भूमिका
Kolkata : भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि या वास्तवाला कोणत्याही घटनात्मक मान्यतेची किंवा कागदोपत्री पुराव्याची आवश्यकता नाही, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. कोलकाता येथे संघाच्या स्थापनेच्या १०० व्या वर्षानिमित्त आयोजित ‘१०० व्याख्यानमाला’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी हिंदू राष्ट्राची संकल्पना, भारतीय संविधान, धर्मनिरपेक्षता आणि संघाच्या विचारधारेबाबत त्यांनी सविस्तर मांडणी केली.
मोहन भागवत म्हणाले की, भारत हे हिंदू राष्ट्र आहे, हे एक नैसर्गिक सत्य आहे. हे सत्य मान्य करण्यासाठी कोणत्याही संविधानिक मंजुरीची गरज नाही. जसे सूर्य पूर्वेकडून उगवतो, हे आपण कोणत्याही कायदेशीर शिक्क्याशिवाय स्वीकारतो, तसेच हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्र आहे, हे वास्तवही स्वीकारले पाहिजे. हे कधीपासून आहे, याची तारीख सांगता येणार नाही, पण जोपर्यंत या भूमीवर भारतीय संस्कृतीचा सन्मान करणारा एकही व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत भारत हिंदू राष्ट्रच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Municipal election result : विक्रमी विजय कोणाचा, तर अवघ्या एका मतामुळे कोण ठरलं ‘कमनशीबी’
संविधानातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांवर भाष्य करताना मोहन भागवत म्हणाले की, हे शब्द मूळ संविधानाच्या प्रस्तावनेत नव्हते. १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे शब्द प्रस्तावनेत समाविष्ट केले. भविष्यात संसदेनं संविधानात ‘हिंदू राष्ट्र’ हा शब्द जोडला किंवा नाही जोडला, तरी त्याने वास्तव बदलणार नाही. संघासाठी शब्दांपेक्षा या भूमीची मूळ ओळख अधिक महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करताना मोहन भागवत म्हणाले की, जन्मावर आधारित जातीव्यवस्था ही हिंदुत्वाची खरी ओळख नाही. जो भारताला आपली मातृभूमी मानतो, भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतो आणि आपल्या पूर्वजांच्या महानतेवर विश्वास ठेवतो, तो प्रत्येकजण हिंदू आहे. हीच संघाची मूलभूत विचारधारा आहे, असे त्यांनी सांगितले.
संघावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, आरएसएस हा हिंदूंच्या हिताचे रक्षण करणारा आणि राष्ट्रवादी संघ आहे, पण याचा अर्थ संघ मुस्लिमविरोधी आहे, असा होत नाही. संघाचे काम पारदर्शक असून कोणीही येऊन ते पाहू शकतो. जर कोणाला संघाच्या कार्यपद्धतीत काही चुकीचे वाटले, तर त्यांनी आपले मत कायम ठेवावे, पण काहीच चुकीचे आढळले नाही, तर आपले विचार बदलण्याची तयारी ठेवावी, असे आवाहनही मोहन भागवत यांनी यावेळी केले. मोहन भागवत यांच्या या विधानांमुळे हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर पुन्हा देशाच्या राजकारणात आणि सार्वजनिक चर्चेत मोठी खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
__








